इच्छुकांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: September 5, 2014 01:19 IST2014-09-05T01:19:41+5:302014-09-05T01:19:41+5:30

पंधरवड्यात भाजपची पहिली यादी; बाळापूर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची स्थानिक उमेदवारीची मागणी.

Desire of the soul | इच्छुकांचा जीव टांगणीला

इच्छुकांचा जीव टांगणीला

अकोला : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संभाव्य उमेदवारांची पहिली यादी येत्या पंधरवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. एबीसी च्या निकषानुसार पहिल्या यादीत संबंधित मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावाचा समावेश राहील. मात्र यातही निवडून आलेल्या ७0 टक्के उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सामोरे जात आहे. महायुतीमधील भाजप व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून शितयुद्ध सुरू आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ५0-५0 असावा, अशी भूमिका घेत भाजपने १३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार व एबीसी निकषानुसार ज्या मतदारसंघात वर्तमान लोकप्रतिनिधी आहेत व ज्यांचा विजय सुनिश्‍चि त आहे, अशा उमेदवारांना प्राधान्याने तिकीट वाटप केले जाणार आहे. यातही सरसकट नव्हे तर ७0 टक्के उमेदवार गृहीत धरल्या जाणार असल्याने उर्वरित ३0 टक्के उमेदवारांचा पत्ता कट होईल, हे निश्‍चित आहे. अशा उमेदवारांनी पक्षाची मनधरणी सुरू केली असून, यामध्ये प्रामुख्याने मूर्तिजापूर मतदारसंघातील इच्छुकांचा समावेश आहे. संबंधित उमेदवाराच्या नावाचा पक्षाच्या यादीत समावेश नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. येत्या पंधरवड्यात भाजपच्यावतीने पहिली यादी जाहिर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर एबीसी नुसार टप्याटप्याने दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
** पार्सल उमेदवार नको!
कधीकाळी भाजपच्या ताब्यात असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अकोल्यातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यासंदर्भात बाळापूर मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तीव्र भावना व्यक्त केल्याची माहिती आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना तिकीट द्या, पार्सल उमेदवार लादू नका, अशा स्वरूपाची विनंती पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडे करण्यात आली.

Web Title: Desire of the soul