शिवरायांच्या विचारांना कृतिशील सलाम; व्याळ्यात पर्यावरणपूरक शिवजयंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:35 IST2026-02-19T20:03:07+5:302026-02-19T20:35:42+5:30
Akola : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’ मोहिमेच्या वतीने व्याळा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.

Creative salute to Shivaji Maharaj's thoughts; Eco-friendly Shiv Jayanti in Vyala
अकोला :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’ मोहिमेच्या वतीने व्याळा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता, महाराजांच्या कृतिशील आणि निसर्गप्रेमी विचारांना प्रत्यक्ष कृतीतून मानवंदना देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थ आणि तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ग्रामपंचायत परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
विदर्भातील वाढते तापमान, दुष्काळी परिस्थिती आणि हवामान बदलाचे वाढते संकट लक्षात घेता, वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले. पुढील पिढीला सुरक्षित, हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विधायक उपक्रमात ‘ग्रीन स्पार्टन’चे ॲड. अमित तेलगोटे, सौरभ बहादूरकर, अभिजीत इंगळे, अभिजीत तेलगोटे, स्वप्नील वानखडे, अंकुश तेलगोटे, उज्वल अंभोरे, शुभम वानखडे, विशाल तेलगोटे, शत्रुघ्न उपरवत आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.
शिवजयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेला हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, समाजाला पर्यावरण जपण्याचा आणि कृतीतून आदर्श घालून देण्याचा संदेश देणारा ठरला.