Hidayat Patel Death: अकोल्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचा जीवघेण्या हल्ल्यात पहाटे मृत्यू झाला. हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर अकोट येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान हिदायत पटेल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली असून जुन्या वादातून आणि बदल्याच्या भावनेतून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मंगळवारी ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हिदायत पटेल हे मोहाळा गावातील मरकज मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या उबेद पटेल नावाच्या युवकाने त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. उबेदने पटेल यांच्या मान, चेहरा आणि पोटावर वर्मी घाव घातल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर परिसरात मोठी पळापळ झाली. जखमी पटेल यांना तातडीने अकोट येथे प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
२०१९ च्या हत्येचा बदला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे २०१९ मधील एका खुनाचा संदर्भ आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर २४ मे २०१९ रोजी मोहाळा येथे भाजपा अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीन खाँ शेर खाँ पटेल यांची हत्या झाली होती. याप्रकरणी मुमताज खाँ यांच्या फिर्यादीवरून हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल यांच्यासह १० जणांविरूद्ध भादंविच्या कलम ३०२सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पटेल यांच्यावर हल्ला झाला. मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हल्लेखोर अटकेत
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. हल्लेखोर उबेद पटेल याने घटनास्थळावरून पळ काढला होता, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पणज येथून ताब्यात घेतले आहे. अकोट पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
कोण होते हिदायत पटेल?
हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे स्तंभ मानले जात होते. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. पटेल हे ८ वर्षे जिल्हाध्यक्ष आणि सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जिल्हा बँकेचे २५ वर्षांपासून संचालक आणि अकोट बाजार समितीचे माजी सभापती म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता.
Web Summary : Congress leader Hidayat Patel was murdered in Akola. The assailant, Ubed Patel, sought revenge for his uncle's 2019 killing, allegedly involving Hidayat. Ubed attacked Hidayat near a mosque. He was arrested; investigation ongoing.
Web Summary : अकोला में कांग्रेस नेता हिदायत पटेल की हत्या कर दी गई। आरोपी उबेद पटेल ने 2019 में अपने चाचा की हत्या का बदला लिया, जिसमें हिदायत कथित तौर पर शामिल था। उबेद ने मस्जिद के पास हिदायत पर हमला किया। वह गिरफ्तार हो गया; जांच जारी है।