कचरा जाळताहेत; सावधान....कर्करोग अन् फुप्फुसांच्या आजारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:17 IST2019-01-02T13:16:54+5:302019-01-02T13:17:01+5:30
अकोला : शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येतो; परंतु हाच प्रकार कर्करोग अन् फुप्फुसाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा जाळत असाल, तर हा प्रकार थांबवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कचरा जाळताहेत; सावधान....कर्करोग अन् फुप्फुसांच्या आजारांचा धोका
अकोला : शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येतो; परंतु हाच प्रकार कर्करोग अन् फुप्फुसाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा जाळत असाल, तर हा प्रकार थांबवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
एरव्ही डम्पिंग ग्राउंडवर शहरातील गोळा झालेला कचरा जाळण्यात येतो. हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी अनेकजण कचरा जाळूनच शेकोटी पेटवितात. त्यात प्लास्टिक किंवा रबराचाही उपयोग करतात, हे विशेष. या प्रकारच्या कचऱ्यामध्ये क्लोरिनेटेड घटक मोठ्या प्रमाणात असतात, जे तुमच्या लिव्हर, फुप्फुसावर घातक परिणाम करण्यासाठी पुरेसे आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वच थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेतात. त्यात प्रामुख्याने रबर किंवा प्लास्टिकचा जाळण म्हणून वापर केला जातो. त्याचा धूर थेट श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतो अन् फुप्फुसाच्या क्रयशक्तीवर घातक परिणाम करतो. आरोग्यावरील हा दुष्परिणाम टाळायचा असेल, तर कचरा जाळण्याची सवय टाळा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
असा होतो घातक परिणाम
कचरा जाळल्यामुळे त्यातून निघणारे क्लोरिनेटेड, कार्बनचे घटक धुराच्या माध्यमातून श्वसनाद्वारे थेट फुप्फुसामध्ये जाऊन अडखतात. त्यामुळे फुप्फुसाच्या क्रयशक्तीवर परिणाम पडतो. कार्बनच्या घटकांचा फुप्फुसांवर वारंवार आघात झाल्यास कर्करोग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या आजारांची शक्यता
- श्वसनाचे आजार
- फुप्फसांशी निगडित समस्या
- आॅक्सिजनची कमी
- कर्करोग
शेकोटीचा आधार घ्या, पण...
हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी बहुतांश लोक शेकोटी पेटवितात; पण त्यात जाळण म्हणून प्लास्टिक किंवा रबराऐवजी लाकडाचा वापर करावा, त्यात पेट्रोल किंवा केरोसीनचा वापर टाळावा. शेकोटीपासून दोन ते तीन फूट अंतरावरच बसण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
साधारणत: शहरात दररोज कचरा जाळण्यात येतो. शिवाय, हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी शेकोटीसाठीदेखील बहुतांश ठिकाणी कचरा किंवा रबर आणि प्लास्टिक जाळले जाते. हा प्रकार आरोग्यासाठी चुकीचा असून, त्यामुळे कर्करोग तसेच फुप्फुसांच्या आजारांचा धोका उद््भवतो.
- डॉ. अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.