केळीवेळी येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:08 IST2019-04-30T12:41:02+5:302019-04-30T13:08:47+5:30
अकोला : आकोट तालुक्यातील केळीवेळी येथे मंगळवार, ३० एप्रिल रोजी स्त्री जातीचे नवजात अर्भक नालीत मृतावस्थेत पडलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

केळीवेळी येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले
अकोला : आकोट तालुक्यातील केळीवेळी येथे मंगळवार, ३० एप्रिल रोजी स्त्री जातीचे नवजात अर्भक नालीत मृतावस्थेत पडलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
केळवेळी येथील अनिल दिनकर आढे यांच्या घरासमोरच्या नालीत मंगळवारी सकाळी नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. गावात वार्ता पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनिल आढे यांनी यासंदर्भात दहीहांडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मृतावस्थेत आढळून आलेले अर्भक कुणाचे असून, तीला नालीत कोणी फेकले, तीला जिवंत असताना फेकण्यात आले, की जीवे मारून फेकण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळू शकली नाहीत. दहीहांडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भिलावाकर, गणेश अवचार, प्रमोद नवलकार करीत आहेत.