पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे सत्यमापन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:26 IST2018-10-23T13:26:45+5:302018-10-23T13:26:54+5:30
अकोला: जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये घेण्यात येणारी माहिती शासनाच्या ‘महामदत अॅप’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे सत्यमापन सुरू
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये घेण्यात येणारी माहिती शासनाच्या ‘महामदत अॅप’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पावसातील खंड, भूजल पातळी, आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने, जिल्ह्यातील अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने संबंधित पाचही तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल व कृषी विभागामार्फत २० आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. पाचही तालुक्यातील क्षेत्रीय सत्यमापनात घेण्यात आलेली गावनिहाय दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती शासनाच्या ‘महामदत अॅप’वर ‘अपलोड’ करण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थितीचे असे करण्यात येत आहे सत्यमापन!
जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गावागावांत महसूल आणि कृषी विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांमार्फत दुष्काळसदृश परिस्थितीचे सत्यमापनाचे काम करण्यात येत आहे. त्यामध्ये शेत सर्व्हे नंबर, शेतकरी, शेतकºयाचा आधार क्रमांक, पीक पेरणीचे एकूण क्षेत्र त्यापैकी प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र, पिकांची परिस्थिती, पीक नुकसानाचे छायाचित्र, पीक नुकसानाचे प्रमाण आणि पिकांचे उत्पादन इत्यादी प्रकारची माहिती सत्यमापनात घेण्यात येत असून, ही माहिती शासनाच्या महामदत अॅपवर अपलोड करण्यात येत आहे.
दुष्काळसदृश पाच तालुक्यांत
अशी आहेत गावे!
तालुका गावे
अकोला १८२
तेल्हारा १०६
बाळापूर १०३
मूर्तिजापूर १६४
बार्शीटाकळी १५७
..................................
एकूण ७१२
जिल्ह्यातील दुष्काळसदृश पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष पीक परिस्थिती, पिकांचे उत्पादन, पिकांचे नुकसान व इतर प्रकारची माहिती घेऊन, शासनाच्या ‘महामदत अॅप’वर ‘अपलोड’ करण्यात येत आहे.
- राजेंद्र निकम
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी