अकोला : बलात्कार प्रकरणातील दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:54 IST2018-01-23T00:54:00+5:302018-01-23T00:54:26+5:30
अकोला : तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या तसेच एलआरटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला व्यवसायाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी सोमवारी अटक केली. मुलीचा गर्भपात करणार्या डॉ. अनिल तायडेलाही पोलिसांनी जळगाव खांदेश येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

अकोला : बलात्कार प्रकरणातील दोघे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या तसेच एलआरटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला व्यवसायाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी सोमवारी अटक केली. मुलीचा गर्भपात करणार्या डॉ. अनिल तायडेलाही पोलिसांनी जळगाव खांदेश येथून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
एलआरटी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय युवतीने एका वर्तमानपत्रात घरी बसल्या द्रोण बनविण्याचा व्यवसाय करा, अशी जाहिरात वाचली. या जाहिरातीच्या आधारे युवतीने डाबकी रोडवरील रहिवासी उमेश अनमोल याच्याशी संपर्क साधला. त्याने युवतीला व्यवसाय उभारण्याचे आमिष देऊन पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र, युवतीकडे पैसे नसल्याने उमेश अनमोल याने त्याची पत्नी सुवर्णा उमेश अनमोल हिला सोबत घेऊन युवतीला तिच्या नावावर असलेल्या शेतीवर ५ टक्के व्याजदराने खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन दिले. उमेशची पत्नी सुवर्णा व सदर युवती या दोघींच्या नावाने हा व्यवसाय थाटण्यात येणार असल्याचे आमिष युवतीला देण्यात आले. त्यानंतर युवतीने तिच्या शेतीवर पाच लाख रुपये कर्ज घेतले. सदर कर्जाची रक्कम उमेश अनमोल याने स्वत:जवळ ठेवून घेतली. मात्र, युवतीला व्यवसाय थाटण्याची सामग्री दिली नाही. त्यामुळे युवतीने शेतीवर घेतलेले कर्ज तातडीने फेडून शेतीवरील बोझा कमी करण्यासाठी अनमोल याला तगादा लावला. मात्र, उमेश अनमोल याने युवतीला सांगितले, की त्याचे पत्नीशी वाद होत असून, तिला घटस्फोट देणार आहे. तसेच युवतीला मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर युवती व उमेश अनमोल हे दोघे जळगाव खान्देश येथे राहावयास गेले. बँकेतून कर्ज काढून पैसे परत करण्याचे आमिष देऊन उमेशने युवतीवर बलात्कार केला. यामध्ये मुलगी गर्भवती राहिल्याने डॉ. अनिल तायडे याच्याकडे तिचा गर्भपात करण्यात आला. फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात येताच तिने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीवरून उमेश अनमोल, सुवर्णा अनमोल, इक्बाल हुसेन व डॉ. अनिल तायडे रा. जळगाव खान्देश यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर यामधील मुख्य आरोपी उमेश अनमोल व गर्भपात करणारा डॉ. अनिल तायडे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.