अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:44 IST2025-09-17T15:42:18+5:302025-09-17T15:44:55+5:30
वर्धा येथील रहिवासी असलेल्या आणि अकोल्यातील शासकीय रुग्णालयासमोर कामाला असलेल्या व्यक्तीची त्याच्याच मित्राने हत्या केली.

अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयासमोरील एका चहाच्या टपरीवर मजुरी करणाऱ्या ४५ वर्षीय इसमाची झोपेत असतानाच दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागासमोर घडली.
वर्धा येथील रहिवासी असलेला तसेच याच ठिकाणी एका हॉटेलात मजुरी काम करणाऱ्याने दारूच्या नशेत ही हत्या केली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घुसर येथील रहिवासी शांताराम गोपनारायण (४५) हे सर्वोपचार रुग्णालयासमोरील एका चहाच्या टपरीवर कामाला होते.
रायपुरे आणि गोपनारायण होते मित्र
त्या टपरीच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये वर्धा येथील रहिवासी रवी रायपुरे हा कामाला होता. दोघेही चांगले मित्र होते. सोमवारी सायंकाळी काम आटोपल्यानंतर सर्वोपचार ते रुग्णालयात उघड्यावर झोपण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. या वादानंतर आरोपी रवी रायपुरे हा दारू पिण्यासाठी गेला.
दगडाने डोकं ठेचले
दारूच्या नशेत परत आल्यानंतर शाब्दिक वादाचा बदला घेण्यासाठी त्याने बाजूलाच असलेला मोठा दगड घेऊन शांताराम गोपनारायण (४५, रा. घुसर) यांच्या डोक्यावर टाकला. गोपनारायण यांना झोपेतून जाग येण्याआधीच त्यांच्यावर दोन ते तीन वेळा दगडाने वार करण्यात आला.
यामध्ये शांताराम यांचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी रायपुरे याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वोपचारमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १ तथा सर्वोपचार रुग्णालयात सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र तरीही सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी घटनास्थळापासून दूर तैनात होते. तर नजीकच्या ठिकाणावर मेस्को कंपनीचे सुरक्षारक्षक तैनात असल्याची माहिती आहे.
फॉरेन्सिक व्हॅन व टीमला सलामी
पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते सोमवारीच फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर काही तासांतच पहिली हत्या झाली. या व्हॅनसह टीमला हत्येने सलामी दिल्याची चर्चा आहे. हत्या झाल्यानंतर काही वेळातच ही टीम दाखल झाली. त्यांनी घटनास्थळ पुरावे गोळा केले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके, सिटी कोतवालीचे ठाणेदार संजय गवई यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.