अशी आहे.. नायजेरियन गुन्हेगारांची मोडस  ऑपरेंडी: मैत्री, पे्रम, गिफ्टचा मोह अन् फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 03:50 PM2019-11-22T15:50:59+5:302019-11-22T15:51:36+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करून आधी प्रेमाचे जाळे आणि नंतर महागड्या गिफ्टच्या मोहात पाडून नायजेरियन गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशभरातील हजारो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

Such is the modus operandi of Nigerian criminals: friendship, perm, gift affection and deception. | अशी आहे.. नायजेरियन गुन्हेगारांची मोडस  ऑपरेंडी: मैत्री, पे्रम, गिफ्टचा मोह अन् फसवणूक 

अशी आहे.. नायजेरियन गुन्हेगारांची मोडस  ऑपरेंडी: मैत्री, पे्रम, गिफ्टचा मोह अन् फसवणूक 

Next

अरुण वाघमोडे ।
अहमदनगर: सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करून आधी प्रेमाचे जाळे आणि नंतर महागड्या गिफ्टच्या मोहात पाडून नायजेरियन गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशभरातील हजारो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. मोठे व्यावसायिक, महिला, तरुण, तरुणी व काही ज्येष्ठ व्यक्तीही नायजेरियन गुन्हेगारांचे शिकार ठरले आहेत़. 
नगरच्या सायबर पोलिसांनी नुकतेच राजस्थान पोलिसांकडून एरगुन फ्रॅण्क आणि मोनिका गॉडविन या आरोपींना ताब्यात घेतले. यातील फ्रॅण्क हा नायजेरियन आहे तर मोनिका ही नोयडाची़ या दोघांसह त्यांच्या साथीदारांनी नगर जिल्ह्यातील एका तरुणीला ऑनलाइन ४५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तर राजस्थान येथील एका महिला काँग्रेस नेत्याचीही तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. वर्षभरापूर्वी याच पद्धतीने एका नायजेरियन टोळीने श्रीरामपूर येथील एका व्यावसायिकाला एक कोटी रुपयाचा गंडा घालता होता. 
ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणा-या नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे रॅकेट दिल्ली व ग्रेटर नोयडा (उत्तरप्रदेश) परिसरात आहे. येथूनच ते ऑनलाइन पद्धतीने देशभरात फसवणूक करतात.  नगर व राजस्थान येथील फसवणुकीत पैसे हस्तांतरित करण्यासाठी ज्या बँक खात्याचा वापर झाला ते खाते सायबर पोलिसांनी बंद केले आहे़. या खात्यावर तब्बल साडेसहा कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियासह, शादी डॉट कॉम, जॉब सर्च वेबसाईट, बँका यासह विविध माध्यमातून हे नायजेरियन गुन्हेगार अनेकांचा डेटा मिळवितात. त्यानंतर सदर व्यक्तींशी संपर्क करतात. त्यानंतर पुढील फसवणुकीची प्रक्रिया सुरू होते. 
अशी आहे मोडस ऑपरेंडी
ज्याची फसवणूक करावयाची आहे ती व्यक्ती महिला असेल तर तिच्याशी पुरुष गुन्हेगार संपर्क करतो़. परदेशात सरकारी सेवेत मोठ्या हुद्यावर अथवा एखाद्या कंपनीचा सीईओ असल्याचे भासविले जाते. आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क केला जातो़. मैत्री झाल्यानंतर  फोन करूनही संवाद साधला जातो़. या संवादासाठी भारतीय तरुण-तरुणींचा वापर केला जातो़. कधी या मैत्रीतून महिला अथवा तरुणी त्या गुन्हेगाराच्या प्रेमातही पडते. त्यानंतर तुमच्यासाठी परदेशातून लाखो रुपयांचे सोन्याचे अथवा हि-यांचे गिफ्ट पाठविले आहे़ असे सांगितले जाते. गिफ्टचा मेसेज आल्यानंतर दोन दिवसांनी दिल्ली विमानतळावर कस्टम अधिका-याचा फोन येतो़. अर्थात याच टोळीकडून हा फोन केला जातो़. गिफ्ट घेण्यासाठी कस्टम ड्युटी म्हणून ५० हजार ते ५ लाख रुपये ऑनलाइन मागितले जातात़. गिफ्टच्या मोहापायी अनेकांनी असे पैसे भरून स्वत:ची फसवणूक करून घेतली आहे. याच पद्धतीने महिलांसह पुरुषांचीही फसवणूक केली जाते.
नायजेरियन गुन्हेगार असे येतात भारतात 
दिल्ली आणि गे्रटर नोयडा परिसरात पंधरा ते वीस हजार नायजेरियन नागरिक राहतात़. पर्यटन, एज्युकेशन, व्यवसाय अथवा मेडिकल व्हिसावर हे नागरिक भारतात आलेले आहेत. यातील बहुतांशी जण ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यासोबत अनेक भारतीय तरुण-तरुणीही या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. अनेक नायजेरियन तरुणांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. त्यांच्याकडे मात्र प्रशासनाकडून चौकशी होत नाही़. त्यामुळे भारतात राहून ते गुन्हेगारी कृत्य करतात. 
...अशी घ्यावी दक्षता 
सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी फ्रे ण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये. अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.फेसबुक व अथवा इतर ऑनलाइन साईटवर आपली वैयक्तिक माहिती अथवा संपत्तीचे प्रदर्शन करू नये. बँकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती देऊ नये. ऑनलाइन बक्षीस, केबीसी, लॉटरी असे आमिष आले तर त्याला बळी पडू नये.

आधुनिक तंत्रज्ञान वापरताना दक्षता न घेतल्याने बहुतांशवेळा ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडतात. ऑनलाइन बँकिंग, फेसबुक, इंस्टाग्राम यासह इतर ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन्स वापराचे ज्ञान पूर्णपणे आत्मसात करूनच त्याचा वापर करावा. इंटरनेटच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात राहू नये़ अथवा आपली माहिती कुणाला देऊ नये़ अशा स्वरुपाच्या दक्षता घेतल्या तर आपली फसवणूक टळते़. 
-अरुण परदेशी, पोलीस निरीक्षक,
 सायबर पोलीस स्टेशन,अहमदनगर.

 

Web Title: Such is the modus operandi of Nigerian criminals: friendship, perm, gift affection and deception.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.