साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:20 AM2020-01-20T07:20:31+5:302020-01-20T07:20:48+5:30

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले.

Saibaba's birthplace controversy: Shirdir's closure temporarily behind | साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

Next

शिर्डी/पाथरी: शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री १२नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी शिर्डीकरांच्या ग्रामसभेच्या मान्यतेने केली.

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. रविवारी शिर्डी कडकडीत बंद होती. फुला-हारांची दुकाने बंद असल्याने भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. रविवारी साईभक्त व ग्रामस्थांनी शहरातून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. त्यामध्ये शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थही सहभागी झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि. परभणी)चा उल्लेख साई जन्मस्थळ असा केल्याने शिर्डीत संताप व्यक्त झाला. हे विधान मागे घेईपर्यंत शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शनिवारी घेतला होता. पंचक्रोशीतील २५ गावांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी द्वारकामाई मंदिरासमोरून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. रॅली साईमंदिराच्या बाहेर आल्यावर साईबाबांची आरती झाली. रॅलीचा समारोप मारुती मंदिराजवळ झाला. या वेळी साईबाबांचा जयघोष करून घंटानाद केला. शिर्डीत दुकाने, रेस्टॉरंट बंद असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सामाजिक संघटना, मुस्लीम बांधवांनी नाश्ता, बिस्कीट, पाणी यांचे भाविकांना वाटप केले. बंदमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले. दर्शनही सुरळीत झाले. भाविकांच्या जेवणाची व राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था साईसंस्थानने ठेवली.

अभ्यास गट नेमला जाण्याची शक्यता

पाथरी (जि. परभणी) हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा पाथरी ग्रामस्थांचा आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते विविध ग्रंथांतील २९ पुरावे सादर करणार आहेत. तर दुसरीकडे, साईबाबांनी आपल्या हयातीत जन्मस्थळ, जात-धर्म आणि वंशाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणूनच सर्वधर्मीय त्यांचे भक्तगण आहेत, असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक अभ्यास गट नेमणार असून त्यांना सहा महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार असल्याचे समजते.

लक्ष आजच्या बैठकीकडे
हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे पाथरी येथील कृती समितीने म्हटले आहे.

पाथरीत भक्तांची गर्दी
या वादामुळे देशातील मीडियात पाथरी शहर गाजत आहे. त्यामुळे पाथरीतही भाविकांची गर्दी वाढत आहे. रविवारी सकाळपासूनच राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची पाथरीत झुंबड उडाली होती.

Web Title: Saibaba's birthplace controversy: Shirdir's closure temporarily behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.