मोहट्याची माया : सुवर्णयंत्र प्रकरणाच्या चौकशीस असहकार्य 

By सुधीर लंके | Published: September 13, 2018 01:43 PM2018-09-13T13:43:38+5:302018-09-13T13:44:31+5:30

मोहटा देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली सुमारे दोन किलो सोने पुरल्याप्रकरणी अद्यापही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे लेखी उत्तर दिले.

Mohatyya Maya: Incompetent in the investigation of the case of gold | मोहट्याची माया : सुवर्णयंत्र प्रकरणाच्या चौकशीस असहकार्य 

मोहट्याची माया : सुवर्णयंत्र प्रकरणाच्या चौकशीस असहकार्य 

Next

सुधीर लंके 
अहमदनगर : मोहटा देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली सुमारे दोन किलो सोने पुरल्याप्रकरणी अद्यापही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे लेखी उत्तर दिले. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत देवस्थानचे विश्वस्त मंडळ या चौकशीस सहकार्य करत नाही, असे नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांचे म्हणणे आहे.  
मोहटा हे प्रसिद्ध देवस्थान असून जिल्हा न्यायाधीश त्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. याशिवाय स्थानिक दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार, गटविकास अधिकारी असे पाच पदसिद्ध व इतर दहा विश्वस्त या देवस्थानचा कारभार चालवितात. या देवस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार करताना सन २०१०-११ मध्ये १ किलो ८९० ग्रॅम सोन्याची सुवर्णयंत्रे बनवून ती मूर्तीखाली पुरली. कागदोपत्री ठराव करुन हे सोने पुरण्यात आले. यासाठी कुठल्याही निविदा न काढता एका पंडिताकडून हे काम करुन घेण्यात आले. ‘लोकमत’ने २०१७ मध्ये ‘मोहट्याची माया’ही मालिका प्रकाशित करुन हा सर्व प्रकार उजेडात आणला आहे. त्यानंतर आमदार नीलम गोºहे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सोने पुरल्याचे मान्य करत या प्रकरणाची नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांमार्फत चौकशी सुरु करण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांनी चौकशी सुरु केली. मात्र, देवस्थानच्या विश्वस्तांना वारंवार नोटिसा पाठविल्यानंतरही ते चौकशीस सहकार्य करत नाहीत. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित असल्याने चौकशी करु नये, असे विश्वस्तांचे म्हणणे असल्याचा अहवाल उपआयुक्तांनी धर्मादाय आयुक्तांना पाठविला आहे. एक वर्षापूर्वीच हा अहवाल पाठविल्याचे माहिती अधिकारातून नुकतेच निदर्शनास आले. नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी २०११ साली याप्रकरणी चौकशी केल्याचेही विद्यमान उपआयुक्तांनी निदर्शनास आणले आहे. 

न्यायालयाची स्थगिती नाही 
सुवर्णयंत्रांची प्रतिष्ठापना थांबविण्यासाठी मोहटा ग्रामस्थांनी औरंगाबाद खंडपीठात २०१४ साली जनहित याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका ‘प्री अ‍ॅडमिशन’ स्तरावर असल्याचे न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिसते. दरम्यान, मोहटा देवस्थानची चौकशी करु नये, असा कुठल्याही न्यायालयाचा आदेश नाही, असे नगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे. देवस्थानचे विश्वस्त मात्र याचिकेचे कारण देत सुवर्णयंत्र प्रकरणाच्या चौकशीस नकार देत आहेत.

नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांनी पाठविलेला अहवाल अद्याप आपण पाहिलेला नाही. अहवालाचे अवलोकन करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल. -शिवकुमार डिगे,धर्मादाय आयुक्त. 

Web Title: Mohatyya Maya: Incompetent in the investigation of the case of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.