First flight arrives at Shirdi airport after lockdown; 41 passengers brought from Hyderabad | लॉकडाऊननंतर शिर्डी विमानतळावर पहिले विमान दाखल; हैद्राबाद येथून आणले ४१ प्रवासी

लॉकडाऊननंतर शिर्डी विमानतळावर पहिले विमान दाखल; हैद्राबाद येथून आणले ४१ प्रवासी

 शिर्डी : लॉकडाऊनमुळे हैद्राबाद येथे अडकलेल्या ४१ प्रवाशांना घेवून इंडिगो एअरलाईन्सचे विमान सोमवारी (दि.१ जून) सायंकाळी शिर्डी विमानतळावर उतरले. गेल्या आठवड्यात हे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले होते.

    या विमानातून आलेल्या प्रवाशांमध्ये अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद येथील स्थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील सर्वांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील प्रवाशांना त्या जिल्ह्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी हे विमान शिर्डी विमानतळावर लँड झाले. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडट दिनेश दहिवाडकर, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगावचे तहसीलदार योगेश चंदे, टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा आदींची उपस्थिती होती़.

   विमानतळावर या सर्व प्रवाशांना सॅनिटायझर पुरवण्यात आले. तसेच त्यांच्या बॅगा व अन्य सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यानंतर लगेचच वैद्यकीय अधिकारी डॉ़. वैशाली आव्हाड, डॉ़. संतोष विधाटे, डॉ़. नितीन बडदे, डॉ़. तेजस्वी शिंदे, आरोग्य सेवक दीपक एकबोटे, आरोग्यसेविका अंजुम पठाण आदींनी या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली़. प्रत्येकाला मास्क घालणे, सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळणे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, राजू पोकळे, राजू सोनवणे आदींनी सहकार्य केले.

या विमानाने येण्यासाठी ५२ व्यक्तींनी बुकींग केले होते. प्रत्यक्षात मात्र ४१ प्रवासी आले. शिर्डीतून या विमानाने हैद्राबादसाठी २८ प्रवासी रवाना झाले.

Web Title: First flight arrives at Shirdi airport after lockdown; 41 passengers brought from Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.