Development in Akole taluka through people's movement, not by anyone's grace; The opinion expressed by this farmer leader | कुणाच्या मेहेरबानीने नाही, जनतेच्या आंदोलनातून अकोले तालुक्यात विकास; या शेतकरी नेत्याने व्यक्त केले मत

कुणाच्या मेहेरबानीने नाही, जनतेच्या आंदोलनातून अकोले तालुक्यात विकास; या शेतकरी नेत्याने व्यक्त केले मत

अकोले: अकोले तालुक्यातील जनतेने कुणाच्या मेहरबानीनं नाही तर मोर्चे, सत्याग्रह आंदोलन करून विकास पदरात पाडून घेतला आहे. कष्ट करणारे उपाशी आणि ऐतखाऊ तुपाशी ही  स्थिती बदलून तालुक्यात विकासात्मक बदलाची परिचिती यावी असे काम आमदार लहामटे यांनी करून दाखवावे. घराणेशाही, सरंजामशाही विरोधात येथील राजकारण असून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर जनता माफ करणार नाही, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला. 

अकोले तालुका विधानसभेची पिचड घराण्याची ४० वर्षांची एकहाती सत्ता २४ आॅक्टोबर २०१९ ला संपुष्टात आली. ही किमया आम जनतेने करून दाखविली. यानिमित्त शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय वर्षपूर्ती सोहळ्यात सावंत बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संदीप वर्पे होते. आनंद सोहळ्याच्या निमित्ताने भाजप सोडून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची आत्मचिंतन बैठक पार पडली.  

निसर्ग पर्यटनक्षेत्राचा विकास, रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविणे व सरकारी सुसज्ज आरोग्यसुविधा उपलब्ध होणे ही तालुक्याच्या जनतेची खरी भूक आहे. त्यासाठीच परिवर्तन घडले हे लक्षात घेऊन विकासात्मक बदल घडून दाखवा मगच  विजयाचा  ढोल वाजवा. जमिनीवर पाय ठेवून आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करताना तालुक्यातील सामाजिकएकीची घडी बिघडू देवू नये, असा सल्लाही सावंत यांनी आमदार किरण लहामटे यांना दिला. 

  अन्यायाविरुध्द  उभे राहणे हा माझा स्थायीभाव आहे. जातीभेदाच्या राजकारणाला थारा देणार नाही. तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग  भरून काढून तरुणाईचे औद्योगिक वस्तीचे स्वप्न पूर्ण करील. वरिष्ठांच्या सहकार्याने पथदर्शी विकास कामांचा आलेख उंचावण्याचे काम सुरु आहे. संगमनेरच्या धरतीवर तालुक्यातील सहकारी संस्थांची घडी बसवू माझ्या काळात मंजूर कामांचेच उदघाटने  करतो. माजी आमदारांनी आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी आरोप करू नये, असे  आमदार लहामटे यावेळी म्हणाले.

Web Title: Development in Akole taluka through people's movement, not by anyone's grace; The opinion expressed by this farmer leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.