Colored training of terrorist attacks by the National Security Team | राष्ट्रीय सुरक्षा पथकाची शिर्डीत अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम
राष्ट्रीय सुरक्षा पथकाची शिर्डीत अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम

शिर्डी : साईनगरीसारख्या आंतरराष्ट्रीय व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युतर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) शिर्डीत सोमवारी सायंकाळी अचानक रंगीत तालीम केली. ही तालीम दोन दिवस चालणार आहे.
सोमवारी सायंकाळी पाच वाजता रंगीत तालमीला सुरूवात झाली. देशातील सर्वाधिक भाविक भेट देणारे ठिकाण म्हणून शिर्डी शहर समोर आले आहे़  वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् मध्येही शिर्डीची नोंद घेण्यात झाली आहे.  सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून एनएसजीच्या जवानांना एका हॉटेलवर दोरांच्या सहाय्याने उतरविण्यात आले. त्यानंतर  या जवानांनी हॉटेलमध्ये घुसून एका अतिरेक्याला कंठस्रान घातले. यानंतर ही सरावाची रंगीत तालीम असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोमवारी रात्री अकरा वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत मंदिर परिसरात संकट व्यवस्थापनाचा सराव करण्यात येणार आहे. अचानक दहशतवादी हल्ला झाला, भाविकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले तर कसा प्रतिकार करायचा? याबाबत यावेळी सराव करण्यात येणार आहे़ या मोहिमेत मुंबई येथील राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे सव्वाशे जवान सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर श्वानपथक, बॉम्ब शोधणारे व नष्ट करणारे पथक, डॉक्टर्स आदींचा सहभाग आहे. यामुळे संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर येवून त्या दुरूस्त करता येवू शकतील, असाही उद्देश आहे़  नागरिकांना व भाविकांना या सराव मोहिमेचा त्रास होऊ नये म्हणून पथक विशेष काळजी घेत आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. मंगळवारी विमानतळावरही अशा प्रकारचा सराव करण्यात येणार आहे.

Web Title: Colored training of terrorist attacks by the National Security Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.