Best Actor Colors 'Momos' | उत्तम अभिनयाने रंगले ‘मोमोज’
उत्तम अभिनयाने रंगले ‘मोमोज’

नाट्य समीक्षण / साहेबराव नरसाळे /
मोबाईल गेम्स्च्या आहारी गेलेल्या तरुणाईची व्यथा आणि कुटुंबावर बेतणा-या दु:खद प्रसंगावर बेतलेले ‘मोमोज’ हे नाटक बुधवारी (दि़४) नगर केंद्रावर सादर झाले. मोमोज या मोबाईल गेम्स्मुळे कोवळ्या वयात मुलांचे जीव जातात, यावर भाष्य करणा-या या नाटकाचे लेखन अ‍ॅड़ चंद्रकांत शिंदे यांनी केले. तर दिग्दर्शन उर्मिला सतीश लोटके यांनी केले. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघाच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले. 
एका सुखवस्तू कुटुंबात सुरेखा व श्रीधर यांच्या संवादाने नाटकाचा पडदा उघडतो. सुरेखा ही गृहिणी तर श्रीधर हा नोकरदार असतो़. सुरेखा सतत श्रीधरच्या मागावर असते. श्रीधर कोणासोबत चॅटींग करतो, कोणासोबत बोलतो, हे पाहण्यासाठी ती सतत त्याचा मोबाईल चेक करीत असते. नंतर पूर्ण घरच मोबाईलच्या अतिवापराचा बळी ठरल्याचे समजते. सुरेखा व श्रीधरचा मुलगा टोटो हा मोमोज गेमच्या आहारी गेलेला असतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याची मैत्रिण मोमोज गेमचे चॅलेंज स्वीकारुन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करते. टोटोलाही आपल्याच बहिणीचा खून करण्याचे चॅलेंज मिळालेले असते. मोमोजच्या आभासी जगतात तो पूर्णपणे फसलेला असतो. त्यामुळे त्याचे वागणेही विक्षिप्त असते. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे आई-वडील, बहीण कुकु हे प्रयत्न करतात. तो दोन वेळा कुकुचा खून करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आई-वडील तिला वाचवितात़ नंतर हे चॅलेंज बदलून त्याला वडिलांनाच मारण्याचे चॅलेंज मोमोज गेममध्ये मिळते. तो वडिलांनाही मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यशस्वी होत नाही़ म्हणून तोच स्वत: आत्महत्या करतो, असे या नाटकाचे कथानक़ केवळ काही तासाचे हे कथानक असल्यामुळे वेगवान घटना घडत राहतात. या घटना प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. 
पहिल्या प्रवेशानंतर नाटकाची गती एकदम वाढते. ही गती शेवटपर्यंत टिकविण्यात दिग्दर्शक उर्मिला लोटके यांना यश आले. त्यांनी पात्र निवड उत्तम केली. कलाकारांकडून अभिनय करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. दोन ठिकाणी संवादात विरोधाभास जाणवला. हा विरोधाभास संवादातील अडथळ्यांमुळे की त्या लेखनातील त्रुटी होत्या, याबाबत संशय आहे. मात्र, या त्रुटी वगळता नाटक ठराविक गतीने पुढे नेण्यात त्या यशस्वी झाल्य. या उत्कंठावर्धक नाटकाचा शेवट अरुचकर झाला. शेवटी सूत्रधाराकरवी दिलेला संदेश मोलाचा असला तरी प्रेक्षकांना एकदम चमच्याने भरविण्याचा मोह टाळता आला असता, असे वाटते.
नाटकातील टोटो ही प्रमुख भूमिका मार्दव लोटके याने साकारली़ सहज सुंदर अभिनय करुन त्याने नाटकात रंगत आणली. टोटोच्या मनाचा कल क्षणाक्षणाला बदलत असतो़ त्यानुसार मार्दवने पकडलेली बेअरिंग उत्तमच़ एका क्षणात त्याच्या चेह-यावर दु:खी भाव तर दुस-या क्षणाला हसरा चेहरा आणि त्यायोग्य संवादफेक करण्याची कसरत त्याने लिलया पेलली. आवाजातील चढउतार, संवादानुरुप आवाजातील विविध रस, अचूक टायमिंग साधत घेतलेले पंच यामुळे मार्दवने पे्रक्षकांवर छाप सोडली. रंगमंचावरील त्याचा सहज वावर आणि देहबोली अप्रतिमच होती. मोमोजच्या आभासी जाळ्यात अडकलेला टोटो साकारताना भावमुद्रा, हालचाली, नजरेतला विशिष्ट कटाक्ष अशा विविध बाबींचा त्याने उत्तम अभ्यास केला असावा, असे दिसते. मोमोजच्या आभासी जगतातून बाहेर आल्यानंतर चेह-यावरील निरागस भाव आणि आवाजातील निरागसता तसेच काहीच सेकंदात पुन्हा त्या आभासी जगतात जाऊन ती बेअरिंग पकडणे अवघड होते. पण मार्दवने ते सहज साध्य केले़ म्हणूनच त्याची भूमिका लक्षवेधी ठरली.
कुकुची भूमिका कोजागरी जोशी हिने केली. मार्दवला उत्तम साथ देत तिने नाटकातील रंजकता अधिक वाढवली. कोजागरीची देहबोली, भावमुद्रा आणि संवादफेक उत्तम होती. संवाद घेताना दोन वेळा ती अडखळली. मात्र, एकूणच तिचा अभिनय उत्तम राहिला. सुरेखाची भूमिका कल्पना नवले यांनी साकारली. सुरेखाच्या भूमिकेला त्यांनी न्याय दिला. संशयी गृहिणी, उतावीळपणा, बापावरचे अवलंबित्व या भूमिकेतील विविध छटा त्यांनी उत्तम रंगवल्या. संवादातील आरोहअवरोह, भावमुद्रा आणि रंगमंचावरील त्यांचा सहज वावर कौतुकास पात्र ठरतो. श्रीधरची भूमिका रवींद्र काळे यांनी साकारली. आवाजातील चढउतार, विविध ढंगातील संवाद आणि अचूक टायमिंग साधत त्यांनी श्रीधरची भूमिका फुलविली. 
शेखर वाघ यांनी विश्वासराव ही भूमिका साकारली. निवृत्त अधिकाºयाची भूमिका साकारताना त्यांचा कस लागला. त्यांच्या वाट्याला त्रोटक संवाद होते़ ते त्यांना अधिक फुलविता आले असते, असे वाटते़ निर्मला रोहोकले यांनी मोमोची भूमिका साकारली. मोमोची बेअरिंग त्यांनी उत्तम सांभाळली. मनिषा लहारे यांनी मोमोसाठी 
आवाज दिला. नाटकाचा अचूक परिणाम साधण्यासाठी त्यांच्या आवाजाचे मोठे योगदान राहिले. 
धनश्री सुडके, नाना मोरेंनी उत्तम नेपथ्य केले़ सुखवस्तू कुटुंबाचे घर भासावे यासाठी घरात विविध वस्तू ठेवलेल्या होत्या. एक भरलेले घर हुबेहूब त्यांनी उभे केले. कलाकारांनीही बहुतांश वस्तुंचा वापर करुन हे नेपथ्य आवाजवी वाटू दिले नाही़. उत्तम नेपथ्य ही या नाटकाची जमेची बाजू म्हणावी लागेल. विनोद राठोड यांनी प्रकाश योजना करताना आपले कौशल्य पणाला लावले. प्रकाश योजनेत विविध छटा वापरुन त्यांनी अपेक्षित परिणाम साधला. शेवटी टोटो इमारतीवरुन आत्महत्या करतो, हे दृष्य उत्तम प्रकाश योजनेमुळेच भासमान ठरविण्यात त्यांना यश आले. मोमोजच्या प्रवेशावेळी लवकर फेडइन घेतला, ही चूक वगळता उत्तम प्रकाश योजना करण्यात त्यांना यश आले.
अजय इंगळे यांची संगीत योजना गरजेनुरुप योग्य होती. काही ठिकाणी ती लाऊड वाटली़ पण अपेक्षित परिणाम साधण्यासाठी तसे करणेही गरजेचे होते.  

Web Title: Best Actor Colors 'Momos'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.