पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाजवळील गटारीचे काम सुरू : आंदोलनाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:34 IST2018-08-04T11:34:24+5:302018-08-04T11:34:52+5:30
धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या गटारीचे काम मनपाच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानाजवळील गटारीचे काम सुरू : आंदोलनाला यश
अहमदनगर : धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या गटारीचे काम मनपाच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले. दि. १ आॅगस्टला परिसरातील संतप्त नागरिकांनी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने घंटानाद आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सदर काम चालू करण्यात आले आहे.
एका धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकाने गटारीवर सिमेंट काँक्रीटचे कुंपण टाकल्याने ही भूमीगत गटार फुटली होती. हे अतिक्रमण हटविण्याची मागणी अॅड. कारभारी गवळी यांनी केली आहे. अनेक दिवसांपासून धर्माधिकारी मळा परिसरातील ग्रीनपार्क येथील भूमीगत गटार फुटल्याने मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन त्याचे डबके साचले होते. या घाण पाण्यामुळे डासाची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची तसेच गटारी जवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमध्ये हे मैलामिश्रीत पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सध्या चालू करण्यात आलेले काम तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी असल्याने गटारीवर असलेले सिमेंट काँक्रीट कुंपणाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.