भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले
By अरुण वाघमोडे | Updated: June 27, 2023 17:04 IST2023-06-27T17:02:06+5:302023-06-27T17:04:26+5:30
आठवले म्हणाले, अगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.

भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले
अहमदनगर: माझे राज्यसभेचे प्रतिनिधित्व २०२६ पर्यंत आहे. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील नेत्यांनी संधी दिली तर मी शिर्डीलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ईच्छुक आहे. आधी या मतदारसंघातून मी निवडणूक लढविली तेव्हा माझा गैरसमजातून पराभव झाला होता. या मतदार संघातील सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे हे माझे चांगले मित्र आहेत. तरीही अगामी लोकसभाशिर्डीतून लढण्यास मी उत्सुक असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि.२७) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
आठवले म्हणाले, अगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. रिपाइंची भाजपासोबत युती आहे. आमच्या युतीला सर्व निवडणुकांमध्ये चांगले यश मिळावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच राज्यात महायुतीच्या सभा घेण्याचे त्यांना सूचविणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही भाजपाकडे जिल्हा परिषदेच्या चार, पंचायत समितीच्या सात ते आठ तर नगर महापालिकेत पाच जागांची मागणी करणार आहोत. असे सांगत आठवले म्हणाले दलित पँथर संघटनेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. ही एक लढाऊ संघटना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही संघटना पुन्हा कार्यन्वित करणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यांचे हे कृत्य दलित समाजाला आवडलेले नाही. औरंगजेबाचे कुणीही उदात्तीकरण करू नये. हिंदू-मुस्लिमांमध्ये कायम ऐक्य रहावे, अशीच आमची भूमिका आहे. असे आठवले म्हणाले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, श्रीकांत भालेराव, किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे आदी उपस्थित होते.