नेवासा : मागील काही महिन्यांपासूनच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर आता एका अधिकाऱ्यासह सहा कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी झालेल्या बदल्यांमुळे नेवासा पोलीस ठाण्यासह नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता या बदल्यांमुळे तरी नेवासा पोलिसांची प्रतिमा सुधारेल का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोलीस कर्मचारी संभाजी गर्जे व एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना नियंत्रण लक्षात बोलावण्यात आले. त्यावेळी कर्मचारी गर्जे यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात पुन्हा एकदा सलग दोन दिवस पोलीस ठाण्यात ऑडिओ बॉम्बने धुमाकूळ घातल्याने पोलीस निरीक्षक विजय करे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. कर्मचारी राहुल यादव यास मुख्यालयात वर्ग करण्यात आले. दरम्यान, प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांच्याकडे पदभार देण्यात आला. ते खुर्चीवर बसत नाहीत तोच त्यांच्याकडून पदभार काढून शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांच्याकडे देण्यात आला. ठाकूर व बागूल यांचा हुद्दा सारखाच असताना ठाकूर यांच्याकडून अवघ्या दोन दिवसात पदभार का काढला याबाबतची चर्चा चांगलीच रंगली असतानाच ३१ ऑगस्ट रोजी नव्याने पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांची कोपरगाव शहर येथे विनंती बदली झाली तर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांची जळगाव येथे बदली झाली. पोलीस निरीक्षक पोवार यांनी पदभार स्वीकारून दोन दिवसही झालेले नसताना सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर यांची संगमनेर शहर, हवालदार विठ्ठल गायकवाड अकोले, सुहास गायकवाड कोपरगाव, जयवंत तोडमल कर्जत, वसीम इनामदार पारनेर, शाम गुंजाळ जामखेड, अंकुश पोटे घारगाव या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या झाल्या. त्यामुळे नेवासा पोलीस दलात खळबळ उडाली.
---
बदल्या नेमक्या कशामुळे?
गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या कशामुळे झाल्या? या बदल्या कोणी करायला लावल्या का? नेमके कुणाचे काय चुकले? याबाबत तर्कवितर्क लढविले जात असले तरी काही कर्मचाऱ्यांवर मात्र या बदल्यांमुळे अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र या बदल्या प्रशासकीय असल्याचे सांगत आहेत.
---
स्वच्छता मोहीम की आणखी काही?
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खरोखरच नेवासा पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम राबविली की काही हेव्यादाव्यातून बदल्या झाल्या? नेवासा पोलीस दलात सुरू असलेली गटबाजी व अशांततेचे वातावरण दूर करण्यासाठी या बदल्या झाल्या आहेत का? झालेल्या बदल्यांमुळे मागील काही महिन्यापासून व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपला लगाम बसेल का? अशा एक ना अनेक प्रश्नांवर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
----
बाजीराव पोवारांसमोर आव्हान
नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासमोर तालुक्यातील फोफावलेली गुन्हेगारी रोखण्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे खचलेले मनोबल उंचावण्याचे आव्हान आहे.