हे काय नवीनच... आमदार निलेश लंकेंनी कोविड सेंटरमध्येच बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 20:51 IST2021-06-07T20:50:49+5:302021-06-07T20:51:31+5:30
सोशल मीडियातूनही लंकेच्या कोविड सेंटरवर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, आता चक्क कोविड सेंटरमध्येच लग्न लावल्यामुळे निलेश लंके चर्चेत आले आहेत.

हे काय नवीनच... आमदार निलेश लंकेंनी कोविड सेंटरमध्येच बांधली लग्नगाठ
अहमदनगर - पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. कोविडच्या संकटात हजारो नागरिकांच्या मदतीला आमदार निलेश लंके स्वत: धावून जात आहेत. त्यामुळेच, राज्यात निलेश लंकेंनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा आणि कौतुक झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आता आमदार निलेश लंकेंचं हे कोविड सेंटर वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं आहे. कारण, या कोविड सेंटरमध्ये चक्क एका जोडप्याची लग्नगाठ बांधण्यात आली आहे.
कोविड सेंटरमध्येच कोरोना रुग्णांची सेवा लंके करत आहेत, ते तेथेच राहतात. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही या कोविड सेंटरला भेट दिली होती. तर, सोशल मीडियातूनही लंकेच्या कोविड सेंटरवर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, आता चक्क कोविड सेंटरमध्येच लग्न लावल्यामुळे निलेश लंके चर्चेत आले आहेत. एका जोडप्याच्या इच्छेखातर त्यांनी कोविड सेंटरमध्येच हे लग्न लावून दिलं. या आरोग्य मंदिरात रुग्णांच्या साक्षीने शुभ विवाह पार पडला. लग्नमंडप उभारला. अक्षता वाटल्या, मंगलाष्टीकाही म्हटल्या आणि सावधान.. म्हणत लग्नाचा बारही उडाला.
सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कोविड सेंटरमधील या विवाहावरुन काहींनी निलेश लंकेंना ट्रोल केलं आहे, तर अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचं संकट असताना असा विवाह कितपत योग्य, हाही मुख्य प्रश्न आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेच्या स्थानिक नेत्यासोबत वाद झाल्यानेही निलेश लंके चर्चेत आले होते.
लंके अन् मनसे नेत्यामध्ये वाद
आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. अविनाश फवार असं या मनसे (MNS) पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. निलेश लंके यांच्या नोटीसला मनसेने देखील उत्तर दिलं आहे. निलेश लंकेंच्या ४ पानांच्या नोटीशीला मनसेने १० पानांच्या नोटीशीने उत्तर दिलं आहे. बेकायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर दिल्याचं ट्विट मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे.