कोरोनाच्या काळात अनेक लग्नसोहळे रद्द झाले. त्यामुळे वऱ्हाडी मंडळीही मर्यादित संख्येत उपस्थित राहत आहेत. त्यामुळे लग्नपत्रिका छापायची तरी कशाला? असा वधु-वरांच्या पालकांना प्रश्न पडतो. त्याऐवजी डिजिटल स्वरुपातील पत्रिका मोजक्या पाहुण्यांना वॉटस् ऑपवर दिली जात आहे. त्यामुळे केवळ ५० ते १०० लग्नपत्रिका छापायची ऑर्डर दिली जात आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विवाह सोहळ्यात केवळ ५० लोकांनाच परवानगी दिलेली आहे. हा आदेश अद्यापही लागू आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. लग्नपत्रिकांसोबतच केटरर्स, सभागृह, रोषणाई, ध्वनिक्षेपक आदी व्यवसायांनाही फटका बसलेला आहे. वेडिंग इव्हेंट करणारेही अडचणीत आहेत.
---
कोरोनाच्या काळात लग्नपत्रिकासह इतर छपाईचा व्यवसाय अडचणीत आला आहे. व्यवसायाची व्याप्ती वाढवायची म्हणून आम्ही मार्चमध्ये नव्या मशिन खरेदी केल्या आणि त्यानंतर कोरोनाचा लॉकडाऊन झाला. तसेच कोरोनामुळे लग्नसोहळ्यांना फक्त ५० लोकांनाच परवानगी दिली जात असल्याने लग्नपत्रिका छापण्याकडे कल कमी झाला आहे. ५० ते १०० पत्रिका छापणे परवडत नाही. लग्नाचे निमंत्रण सोशल मीडियावरून दिले जात असल्याने आमचा व्यवसाय ठप्प आहे.
-राहुल पासकंटी, पटवर्धन चौक, नगर
---------------
१० टक्केच व्यवसाय सुरू
मार्चपासून लॉकडाऊन असल्याने यंदा लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय जवळपास बंदच होता. तसेच सध्याही १० टक्केच पत्रिका छापण्यासाठी येतात. त्याचीही संख्या ५० ते १०० इतकी असते. किमान ५०० पत्रिका असतील तरच छपाईचा खर्च परवडतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ विनय गुंदेचा यांनी सांगितले. ५० लग्नपत्रिका असल्या तरी त्याचे डिझाईन ग्राहकांना नवे व ताजे हवे असते. आठ महिन्यांपूर्वी आणलेला पत्रिकेचा नमुना जुना होत असल्याने त्याचाही भुर्दंड सोसावा लागतो. तसेच तयार लग्नपत्रिका घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे, असे ते म्हणाले.