जल सुरक्षा व ऊर्जा सुरक्षेने शेतीत समृद्धी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:30 IST2026-03-15T14:30:18+5:302026-03-15T14:30:49+5:30
मागेल त्याला ठिबक तसेच तुषार सिंचन व सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज अशी जलसुरक्षा व ऊर्जा सुरक्षा प्रदान केल्याने राज्यात शेती क्षेत्रात समृद्धी आल्याची उत्पादनात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जल सुरक्षा व ऊर्जा सुरक्षेने शेतीत समृद्धी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राहुरी : मागेल त्याला ठिबक तसेच तुषार सिंचन व सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज अशी जलसुरक्षा व ऊर्जा सुरक्षा प्रदान केल्याने राज्यात शेती क्षेत्रात समृद्धी आल्याची उत्पादनात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ रविवारी आयोजित ३९ व्या पदवीदान समारंभामध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते फडणवीस यांचा डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने गौरव करण्यात आला. समारंभास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आयसीएआरचे निवृत्त संचालक डॉ. अशोक कुमार सिंग, कुलगुरू व्ही. के. खर्चे, कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नागपूर येथील म्हाफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता साताप्पा खरबडे, दत्तात्रय उगले, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. सचिन नलावडे, सदाशिव पाटील, स्वाती निकम खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने २२ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवली. भारत सरकारने आपल्या अहवालामध्ये या गावांमध्ये पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले. हवामानातील बदल हे राज्यातील शेतकऱ्यांपुढील सर्वात मोठे संकट आहे. यंदाही कमी पाऊसमानाचा अंदाज आहे. अशावेळी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. जैवतंत्रज्ञानाद्वारे प्रतिकूल हवामानात तग धरू शकतील असे वाण विकसित करणे ही विद्यापीठांसमोरील जबाबदारी आहे.
अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक शेततळे
मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जिरवल्याने फळ उत्पादनात राज्याने प्रगती केली. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये १६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती वर्षाअखेरीस होणार आहे. शेतकऱ्यांना त्यातून दिवसा १२ तास मोफत वीज मिळू शकेल, असे फडणवीस म्हणाले.
राज्यपाल वर्मा म्हणाले, भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधीष्टीत उपाय, स्टार्टप्स, कृषी उद्योग व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतीमध्ये दडलेले आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही तर ग्रामीण समाज उन्नतीसाठी व्हावा. कृषिमंत्री भरणे यांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरीमागे न लागता उद्योग, व्यवसाय उभारण्याचे आवाहन केले.
महाविस्तार एआय एप
राज्य सरकारने कृषी क्षेत्रात महाविस्तार एआय एप तयार केले आहे. ३० लाख शेतकऱ्यांना त्यात जोडण्यात आले आहे. हवामान अंदाज, किड नियंत्रण यावर शेतकऱ्यांना ॲपद्वारे मार्गदर्शन केले जाते. मुंबईत झालेल्या एआय शिखर संमेलनात राज्याला शेती क्षेत्रातील एआय वापराच्या सादरीकरणाची संधी मिळाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.