शेवगाववर जलसंकट
By Admin | Updated: July 19, 2014 00:36 IST2014-07-18T23:23:53+5:302014-07-19T00:36:23+5:30
शेवगाव : पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही पाऊस नसल्याने शेवगाव तालुक्यावर जलसंकट उभे राहिले आहे.

शेवगाववर जलसंकट
शेवगाव : पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही पाऊस नसल्याने शेवगाव तालुक्यावर जलसंकट उभे राहिले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांना टँकरविषयी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
शेवगाव तालुक्यातील २५ गावे व ९८ वाड्या, वस्त्यांना सध्या २५ टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तसेच पाथर्डी तालुक्यासाठी ८३ टँकर सुरू आहेत. तहानलेल्या गावांच्या संख्येत आता दिवसागणिक वाढ होत आहे. पाणी टंचाईची तक्रार येताच संबंधित गावासाठीच्या टँकर प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी सांगितले.
पाऊस लांबल्यास शेवगाव तालुक्यातील ३८ गावे व १२३ वाड्या वस्त्यांसाठी सुमारे १ कोटी २७ लाख रुपयांचा आपत्कालीन आराखडा जिल्हा स्तरावर देण्यात आल्याची माहिती तहसीलदार हरिश सोनार, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
(तालुुका प्रतिनिधी)
टँकरविषयी रोज अहवाल देण्याचा आदेश
शेवगाव शहरानजीकच्या खंडोबामाळ उद्भवावरून १३, राक्षी उद्भवावरून २७, चापडगाव ११ व अमरापूर उद्भवावरून ४ टँकर भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टँकरने पाणी भरून तो लाभधारक गावाकडे रवाना झाल्यानंतर याबाबतची माहिती तसेच टँकर गावात पोहचल्यानंतर ग्रामसेवक, सरपंच तसेच पाणी पुरवठा समितीच्या सदस्याने संबंधित यंत्रणेस एसएमएसद्वारे माहिती देण्याचा दंडक घालण्यात आला आहे. उद्भवावरून टँकर भरल्याची वेळ नमूद करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस देण्यात आले आहेत. तसेच रोज सायंकाळी या सर्व कामाचा ताळमेळ लावून रोजचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याचे आदेशही प्रांताधिकाऱ्यांनी दिले.