अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांशी बोलणी सुरू केली आहे. मात्र साखर कारखाने वेळकाढूपणा करत असून, त्यांचा हा वेळकाढूपणा सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर बेतत आहे, असे मत आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ व्यक्त करीत आहेत.
कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. संकट काळात साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारून रुग्णांना वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आर्जव सरकारने कारखान्यांना केली आहे. मात्र, संगमनेर, प्रवरा आणि काेळपेवाडी या सहकारी साखर कारखान्यांनी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करण्याबाबत कळवले आहे. मात्र, त्यांचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. तर उर्वरित कारखान्यांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सहकारी साखर कारखान्यांनी नफ्या-तोट्याचा विचार न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, कोरोनाच्या संकट काळात मात्र सहकारी साखर कारखाने हात आखडता घेताना दिसत आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने इथेनॉल प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन केले. पण, इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करणे खर्चिक आहे. तसेच ही पद्धत वेळखाऊ आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करणे हा पर्याय पुढे आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. या खर्चासाठी संचालक मंडळाची परवानगी लागेल. त्यासाठी संचालक मंडळांची बैठक घेऊन, बैठकीत काय ठरते, ते पाहू, अशी कारणे कारखाना व्यवस्थापनाकडून पुढे केले जात आहे.
हवेतून ऑक्सिजन करण्याचा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज १ टन २५० किलो लीटर ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील साखर कारखाने उभे करू शकतात. त्यासाठी इथेनॉलच्या प्रकल्पात बदल करण्याची गरज नाही. हा प्रकल्प पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने उभा करू शकतात, असे काहींचे म्हणणे आहे.
....
शरद पवारांच्या सूचनेलाही
राष्ट्रवादी नेत्यांकडून बगल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांनी कोरोनाच्या संकट काळात मदत करावी. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजनचे प्रकल्प उभे करावेत, अशी सूचना पवार यांनी केली होती. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. परंतु, या कारखान्यांनीही पवार यांच्या सूचनेला सोयीस्करित्या बगल दिल्याचे यावरून दिसते.