अहमदनगर : सध्या कोरोना रुग्णांना रेमडेसिविर, ऑक्सिजन तुटवडा अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना हजारो रुपये मोजून इंजेक्शन खरेदी करावे लागत आहेत. अशा पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचे केलेले वाटप योग्यच आहे. या त्यांच्या समाजोपयोगी कामामुळे सर्वसामान्यांना दिलासाच मिळाला आहे. त्यामुळे यावरून राजकारण व्हायला नको, अशी अपेक्षा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली तसा रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचाही तुटवडा भासू लागला. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविरचा काळाबाजार होऊ लागला. अगदी चाळीस ते पन्नास हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले गेले. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळविण्यासाठी धडपडतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
अशा परिस्थितीत खासदार डॉ. सुजय विखे यांनी गेल्या आठवड्यात काही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध केले होते. त्याचे वाटपही त्यांनी केले. त्यानंतर ते इंजेक्शन कसे मिळविले याबाबतचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांना इंजेक्शन कसे मिळाले? त्यांनी नेमके कोणाला दिले? याबाबत चर्चा रंगली. त्यांच्या या धोरणावर काहींनी टीकाही केली.
याबाबत कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे त्या इंजेक्शनची मागणी अधिक आहे. मात्र, ते इंजेक्शन मिळत नाहीत. त्याअभावी रुग्णांना जीव गमावावा लागण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत डॉ. विखे यांनी काही प्रयत्न करून इंजेक्शन मिळविले असतील व सर्वसामान्यांना वाटप केले असतील तर ते त्यांनी योग्यच केले. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. यावरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत यावरून राजकारण करणे योग्य ठरणार नाही, असेही कर्डिले म्हणाले.