केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, विखे पाटलांनी शिवसेनेला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 15:05 IST2022-10-09T15:04:40+5:302022-10-09T15:05:20+5:30
विखेपाटील म्हणाले, केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे

केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, विखे पाटलांनी शिवसेनेला फटकारलं
घारगाव : (जि. अहमदनगर) - शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला भाजपचे नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर दिले आहे.
विखेपाटील म्हणाले, केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे. त्यांनी जनाधार गमावला,सरकार गमवलं.त्यांना आता स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहिलेले थोडेफार जे काही संघटन आहे ते कसे टिकवता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आता पर्यंत दुर्दैवाने त्यांना चुकीचे सल्लागार मिळाले होते. त्यांचे प्रवक्ते बेताल विधाने करत होते. सत्याचा विजय होतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नैतिक पराभव असल्याचे महसूलमंत्री विखे म्हणाले.