बेकायदा रिक्षा वाहतुकीला अधिकाऱ्यांचे अभय!
By Admin | Updated: July 19, 2014 00:35 IST2014-07-18T23:22:51+5:302014-07-19T00:35:53+5:30
अहमदनगर: खासगी रिक्षा चालक व शासकीय अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याने शहरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात आहे.
बेकायदा रिक्षा वाहतुकीला अधिकाऱ्यांचे अभय!
अहमदनगर: खासगी रिक्षा चालक व शासकीय अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याने शहरात अवैध प्रवासी वाहतूक जोमात आहे. या संबंधामुळेच शहरातील ३ हजार ८०० रिक्षाचे परवाने बाद झाल्याचा आरोप जिल्हा रिक्षा पंचायतीने केला आहे. तक्रारीचे तसे निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
शहरात ५ हजार खासगी व अॅपे रिक्षांतून बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. जिल्हा रिक्षा पंचायतीने यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या पण त्याची दखल घेतली गेली नाही. बेकायदा रिक्षांमुळे परवानाधारक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आठ दिवसात बेकायदा रिक्षाची वाहतूक बंद करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा परवाने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तर रिक्षा पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा करण्याचे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी दिली. वेळप्रसंगी आत्मदहन करू असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१५ आॅगस्टला रिक्षा बंद
रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय अॅटो रिक्षा मालक संघटनेने घेतला असल्याचे घुले यांनी सांगितले. हे मंडळ अस्तित्वात आले तर शासनाला एक रुपया खर्च न करता रिक्षा चालकांना पेन्शन, विमा आरोग्य योजना व मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळू शकेल. कल्याणकारी मंडळाचा निर्णय मार्गी न लागल्यास राज्यभर १५ आॅगस्टला रिक्षा बंद राहणार आहे. रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीला बंदीचे धोरण रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे.