गटारीच्या चेंबरमध्ये गुदमरून दोघा युवकांचा मृत्यू; भूमिगत गटारीचा तुंबला होता चेंबर
By सुदाम देशमुख | Updated: July 10, 2025 22:36 IST2025-07-10T22:34:07+5:302025-07-10T22:36:19+5:30
युवकाला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या तरुणाची मृत्यू

गटारीच्या चेंबरमध्ये गुदमरून दोघा युवकांचा मृत्यू; भूमिगत गटारीचा तुंबला होता चेंबर
देवगाव : संगमनेर नगर परिषदेच्या भूमिगत गटारीच्या तुंबलेल्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या युवकाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी कोल्हेवाडी रस्त्यावर घडली. या युवकाला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचेही निधन झाले.
अतुल रतन पवार (वय : १९, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) आणि रियाज जावेद पिंजारी (वय : २१, रा. मदिनानगर) अशी मयत युवकांची नावे आहेत. मयत पवार हे ठेकेदाराचे कर्मचारी होते. नगर परिषदेच्या हद्दीत कोल्हेवाडी रस्त्यावर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गटारीचा मोठा चेंबर आहे, तो तुंबला होता. त्यामुळे तेथे काम करण्यासाठी अतुल पवार गेला होता. चेंबरचे झाकण उघडून काम करण्यासाठी तो आत उतरला, अंदाजे १० ते १२ फूट खोल असलेल्या या चेंबरमध्ये तयार झालेल्या विषारी वायूमुळे पवार याचा जीव गुदमरला. चेंबरमध्ये काम करताना कर्मचारी अडकल्याचे पिंजारी आणि इतर स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. पवार याला वाचविण्यासाठी पिंजारी हा तातडीने चेंबरमध्ये उतरला. मात्र, मोठ्या प्रमाणात विषारी वायू चेंबरमध्ये पसरला असल्याने तोसुद्धा बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी अजूनही दोघे-तिघे चेंबरमध्ये उतरले. मात्र, विषारी वायूमध्ये पवार आणि पिंजारी यांना बाहेर काढण्यात अडथळा येत होता. चेंबरमध्ये अडकलेल्या दोघांंना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी ऑक्सिजन सिलेंडर आणून त्याद्वारे चेंबरमध्ये ऑक्सिजन सोडण्यात आला होता.
सेवानिवृत्त सैनिक मदतीला धावला
देवगाव येथील सेवानिवृत्त सैनिक प्रकाश कोटकर हे मदतीला धावले आणि चेंबरमध्ये उतरले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजारी याला बाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. बचाव कार्यात स्थानिक नागरिकांची मदत झाली. सेवानिवृत्त सैनिक कोटकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत
कामगार जिवाची पर्वा न करता चेंबरमध्ये उतरतात. त्यांची ठेकेदारमार्फत काळजी घेतली जात नाही. पवार याच्या मृत्यूला ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे, याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.