श्रीगोंदा : जादूटोण्याच्या चमत्काराने क्षणात रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथे साडेचार लाखास लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली. ही लुटीची घटना शुक्रवारी (दि. १३) घडली.
संतोष साहेबराव देवकर, अशोक फकिरा चव्हाण (रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) दोघांना श्रीगोंदा पाेलिसांनी अटक केली. पोलिसांनी एक मोटारसायकल, दोन मोबाईल, ३ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली. पोलिसांनी एक मोटारसायकल, दोन मोबाईल, ३ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली.
दत्तात्रय महादेव शेटे (रा. करमाळा) यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दत्तात्रय शेटे हे कर्जबाजारी झाले होते. ते या भोंदूंना समजले. त्यांनी तुम्हाला क्षणात रक्कम दुप्पट करून देतो, असे सांगितले. साडेचार लाख रुपये द्या, नऊ लाख रुपये करून देतो, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार हिरडगाव फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी भेटून पैसे देण्याचे निश्चित करण्यात आले. शेटे यांनी मित्रांकडून साडेचार लाख रुपये उसने घेतले. ते पैसे, फुले, काळी बाहुली, तांदूळ, गुलाल, बुक्का घेऊन आले. कारच्या डिकीत पैसे व पेटी ठेवली. दोघा भोंदूंनी डिकीतील पैसे काढून घेतले. घरी जाईपर्यंत डिकीतील पेटी उघडू नका, अन्यथा पैसे दुप्पट होणार नाहीत, असे शेटे यांना सांगितले. त्यांनी करमाळ्याला जाईपर्यंत डिकी उघडली नाही. घरी गेल्यावर पेटी उघडली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेटे यांनी शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अकुंश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड यांनी थेऊर येथील एका मंदिरात लपलेल्या दोन्ही भोंदूंना अटक केली.