पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, चार तास उलटूनही वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:24 IST2025-05-01T13:24:38+5:302025-05-01T13:24:59+5:30
Pune Nashik Highway Traffic Update: आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घात यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, चार तास उलटूनही वाहतूक ठप्प
घारगाव : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात गुरुवारी (दि.१) सकाळी नऊ वाजलेपासून वाहतूक कोंडी सुरु झाली असून दुपारी एक वाजेपर्यंतपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नाही. ठप्प झालेले रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा वाहनधारकांसह ग्रामस्थांनी दिला आहे. परिसरात सुरु असलेल्या सिमेंट काँक्रेटीकरणाच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घात यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. आज गुरुवारी सकाळपासून दीड किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. महामार्ग सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरु असून मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सध्या काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक नाशिक लेनने वळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या गोंधळावर प्रशासनासह वाहतूक पोलीसांचेकडून नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत आहे.
रस्त्याचे काम सुरु झालेपासून वाहतूक कोंडी होत आहे. महामार्ग प्रशासन व महामार्ग पोलिसांचे कोणतेही नियोजन नाही. घारगाव हे मोठे गाव असून येथे संथ गतीने काम चालू आहे त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. अपघात होत आहेत. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत.
- अजय फटांगरे, मा.जिल्हा परिषद सदस्य.
सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याने अनेक अपघात झाले आहेत. अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. आम्ही महामार्ग प्रशासनाचे अधिकाऱ्यांना वेळोवेळी याबाबत कळविले आहे. मात्र, त्याचेकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. ठेकेदार कंपनी व अधिकारी यांची मिलीभगत आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याचे काम व वाहतूक सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
- गौरव डोंगरे,सामाजिक कार्यकर्ते