नगरसेवकांचा ठिय्या,घेराव

By Admin | Updated: May 6, 2016 23:23 IST2016-05-06T23:11:26+5:302016-05-06T23:23:13+5:30

ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी खंडोबामाळ जलशुद्धीकरण प्रकल्पावर ठाण मांडून प्र्रकल्पाचे कामकाज काहीकाळ बंद पाडले

Throwing of corporators, gherao | नगरसेवकांचा ठिय्या,घेराव

नगरसेवकांचा ठिय्या,घेराव

शेवगाव : शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी खंडोबामाळ जलशुद्धीकरण प्रकल्पावर ठाण मांडून प्र्रकल्पाचे कामकाज काहीकाळ बंद पाडले.चर्चेसाठी आलेल्या ‘जिपलपा’ च्या सहायक अभियंत्यांनाही घेराव घालून त्यांना धारेवर धरले.
येत्या दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार नगरसेवकांनी जाहीर केला. शेवगाव शहरासह प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ५४ गावांना जायकवाडी बॅक वॉटरमधून पाणी पुरवठा होतो. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने चराची रुंदी वाढवून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, चराला अनेक ठिकाणी चढ-उतार असल्याने व लेव्हल नसल्याने जॅकवेलपर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी २४० अश्वशक्तीच्या २ मोटारींची आवश्यकता असताना गेल्या २ वर्षांपासून एकाच जुन्या मोटारीद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जॅकवेलवर पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभारण्यात आले असून त्यावर वीज कनेक्शन जोडण्यात आलेले नाही.
मागील महिन्यात उपाययोजना हाती घेण्याची गरज असताना आता तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सहन करण्यापलीकडचा असल्याची टीका नगरसेवकांनी केली.
आंदोलनात कृष्णा ढोरकुले, साईनाथ आधाट, विनोद मोहिते, अशोक आहुजा, अरुण मुंडे, दिगंबर काथवटे, नितीन दहिवाळकर, कैलास तिजोरे, विकास फलके, वजीर पठाण, अंकुश कुसुळकर, सागर फडके, अजय भारस्कर, नंदकिशोर सारडा, महेश फलके आदींसह सर्व नगरसेवक सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवक आक्रमक
नगरसेवकांच्या आंदोलनामुळे टँकरचे पाणी भरण्याचे कामही काही वेळ रेंगाळले. शेवगाव पंचायत समितीच्या ‘जिपलपा’ विभागाचे सहायक अभियंता सोपान घुले यांनी आंदोलनस्थळी येवून नगरसेवकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी खंडोबा माळ जलशुद्धीकरण प्रकल्पावरून माहिती घेतली असता ६ नव्हे तर केवळ ४ मोटारी सुरू असल्याचे व मोटारी जोडण्याचे काम सुरू असल्याने जलशुद्धीकरण प्रकल्पावरील वीज पुरवठा बंद असल्याने दिसून आले. तसेच केंद्रावरील वीज पुरवठा रोज दीर्घकाळ बंद राहत असल्याने आपोआपच शहराला कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याची वस्तुस्थिती दिसून आल्याने संतप्त नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

Web Title: Throwing of corporators, gherao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.