चोरीच्या गुन्ह्यातील दोघा संशयितांना पकडण्यासाठी पोलिस गेले; मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी मुळा धरणाच्या पाण्यात उड्या टाकल्या. दोघांपैकी एकजण पोहून बाहेर निघाला आणि पसार झाला. दुसऱ्या तरुणाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना जांभळी शिवारात घडली. रामा माळी असे मयत तरुणाचे नाव आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लक्ष्मीबाई भागवत बाचकर (वय ६५, रा. जांभळी) व त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे बुधवारी (दि. ९) त्यांच्या घरात झोपले होते. १२. ३० च्या दरम्यान तीन चोरटे बाचकर यांच्या घरात घुसले. लक्ष्मीबाई बाचकर यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व कानातील फुले ओरबाडून पेटीतील दागिन्यांसह चार तोळे घेऊन पळून जात होते. तेव्हा लक्ष्मीबाई यांचा मुलगा अंबादास याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
तिघांवर पोलिसांनी दाखल केला होता गुन्हा
चोरटे लक्ष्मीबाई व त्याचा मुलगा अंबादास यांना मारहाण करून पसार झाले. या बाबत लक्ष्मीबाई भागवत बाचकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवि (पूर्ण नाव नाही, रा. जांभळी) व दोघे अनोळखी अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ५ च्या दरम्यान राहुरीचे पोलिस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी वावरथ येथे गेले. तिघांपैकी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले. पथक आल्याची चाहूल लागताच रामा ज्ञानदेव माळी (वय २९) व व संदीप बर्डे (वय २७, रा. गंगाधर वाडी, वावरथ जांभळी) या दोघा संशयित तरुणांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली.
एक आरोपी धरणातून बाहेर आला, तर दुसरा...
संदीप बर्डे हा पोहून बाहेर आला आणि पसार झाला. रामा माळी हा तरुण पाण्यात बुडाला. पोलिसांनी सलग तीन दिवस धरणाच्या पाण्यात त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. तब्बल चार दिवसांनी रविवारी (दि. १३) रामा माळी याचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला.
प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मातची नोंद करण्यात आली.