उन्हाचा पारा, वाहनांच्या लांबच लांब रांगा; नाशिक-पुणे महामार्गावर कामामुळे वाहतुकीचा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:48 IST2025-04-06T14:47:18+5:302025-04-06T14:48:07+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा ते घारगाव यादरम्यान दररोज वाहतूक ठप्प होत आहे. महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.

Summer heat, long queues of vehicles; Traffic disruption due to work on Nashik-Pune highway | उन्हाचा पारा, वाहनांच्या लांबच लांब रांगा; नाशिक-पुणे महामार्गावर कामामुळे वाहतुकीचा बोजवारा

उन्हाचा पारा, वाहनांच्या लांबच लांब रांगा; नाशिक-पुणे महामार्गावर कामामुळे वाहतुकीचा बोजवारा

घारगाव (अहिल्यानगर) : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव परिसरात सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत आहे. पुणे ते नाशिक लेनवर अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रविवारी सुट्टी असल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. उन्हाच्या होरपळून काढणाऱ्या झळा आणि वाहतुकी कोंडीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आंबी खालसा फाटा ते घारगाव यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. महामार्ग सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून, मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर सध्या काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक नाशिक लेनने वळविण्यात आली आहे. 

एकेरी वाहतूक व अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या गोंधळावर प्रशासनासह वाहतूक पोलीसांचेकडून नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. 

कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल, त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत आहे. त्यामुळे पूल पास करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा कालावधी लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी जागाच नसल्याने मिळेल, त्या जागेतून दुचाकीस्वार पुढे जातात. त्यातूनही कोंडीत भर पडत आहे.

'गेल्या काही महिन्यांपासून आंबी खालसा फाटा येथे बोगद्याचे काम सुरु आहे. आता महामार्गाचे काँक्रेटीकरणाचे काम सुरु आहे. हे कामे संथगतीने सुरु असल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबधित प्रशासनाने त्यांची यंत्रणा सक्रीय ठेवणे गरजेचे आहे. मात्र, असे काही दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकांना तासनतास उभे राहावे लागत आहे', असे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.

Web Title: Summer heat, long queues of vehicles; Traffic disruption due to work on Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.