लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. कधी पैशासाठी, तर पुत्रप्राप्तीसाठी भानामती, बुवाबाजीचे प्रकार जिल्ह्यात सुरू असून, हे प्रकार रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. या समितीने जिल्ह्यातील अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत.
जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील चांदा येथील धनासाठी दिलेला बळी, मोहटादेवी येथे पुरविलेले सोने, शनी शिंगणापूर येथील सत्याग्रह ही प्रकरणे राज्यभर गाजली. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही अंधश्रद्धेचे भूत कायम असल्याचे वरील प्रकारांवरून समोर आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांकडे न जाता बुवा-बाबांकडे खेट्या घातल्या जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. नेवासा व शेवगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी असे प्रकार सुरू होते. अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. या कायद्यांची प्रशासकीय यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे भानामती, बुवाबाजीचे प्रकार सुरूच असून, ते रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
...
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हवी
राज्यात २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करण्यात आला; परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागात बुवाबाजी, भानामतीचे प्रकार घडत असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
...............
बुवाबाजीची २० हून अधिक प्रकरणे
गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यात २० हून अधिक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. भानामती करून आजार बरे करण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू होते. ते रोखण्यात यश आले असून, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
.....
नेवासा तालुक्यातील चांदा येथे धनासाठी बळी देणे, मोहटादेवी येथे सोने पुरणे, देशात स्त्री-पुरुष समानता असताना शनी शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारणे, याविरोधात आवाज उठविला. त्यामुळे अंधश्रद्धेचे अनेक प्रकार थांबले आहेत. शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे जरुरीचे आहे.
-बाबा आरगडे, सल्लागार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
....
सूचना: डमी क्रमांक १०९१