श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील ज्वलंत प्रश्न असलेल्या डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या प्रलंबित प्रकल्पासंदर्भात श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. त्यावर शरद पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बापूराव सिदनकर उपस्थित होते.
बाळासाहेब नाहाटा म्हणाले, डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या तीन बैठका झाल्या. मात्र, निर्णय झाला नाही. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा शेती सिंचनाच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
बाबासाहेब भोस म्हणाले, या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, मार्ग निघत नाही. साहेब, तुम्ही लक्ष घातले तरच हा प्रकल्प होऊ शकतो.
याबाबत शरद पवार म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.
---
अनेक दिवस केवळ राजकारणच
डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या प्रश्नावर अनेक दिवसांपासून केवळ राजकारण सुरू आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने कुकडी प्रकल्पाच्या चार हजार कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली होती. यामध्ये डिंभे-माणिकडोह बोगद्याला मंजुरी दिली होती. मात्र, राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि बोगदा तळपृष्ठ निश्चितीचा विषय पुढे आला. त्यानंतर या कामाबाबत टोलवाटोलवी सुरू झाली. आता नाहाटा-भोस यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुन्हा हा विषय चर्चेत आणला आहे.
----
फोटो आहे..