पोलीस घटनास्थळी पोहोचला, पण...; तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 00:22 IST2025-03-07T00:21:56+5:302025-03-07T00:22:24+5:30
सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो.

पोलीस घटनास्थळी पोहोचला, पण...; तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Ahilyanagar Murder: वैभव नायकोडी याच्या हत्येपूर्वी त्याला मारहाण झाल्याची माहिती एमआयडीसी वैभव नायकोडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला मिळाली होती. संबंधित कर्मचारी घटनास्थळी गेलाही होता. परंतु, आरोपींना न रोखता तो परत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आता पोलिस अधीक्षकांनी चौकशी सुरु केली आहे.
सावेडी उपनगरात ढवण वस्ती येथे राहणाऱ्या वैभव शिवाजी नायकोडी (वय १९) याची २२ फेब्रुवारी रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. आरोपींनी मयत तरुणाचे सकाळी साडेआठ वाजता अपहरण केले होते. ही माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली होती. तो घटनास्थळी जाऊन परत आला. सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यातच विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. असे असताना एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आरोपी ताब्यात असूनही छडा लागला नाही
आरोपींना २७ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वैभव आमच्या तावडीतून पळून गेला. तो कुठे गेला हे माहिती नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती आरोपींनी दिली. त्यामुळे घटनेची उकल करण्यात अपयश आले.
हाडेही गायब केली
आरोपींनी मयताचे दहन केले. त्यानंतर त्याच्या हाडांचीसुद्धा विल्हेवाट लावली. पोलिसांनी राखेची अक्षरशः चाळणी करून हाडांचे बारीक अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी गोळा केले आहेत.
आईने केली होती तक्रार
मयताच्या आईने २५ फेब्रुवारीला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रारीची दाखल घेतली नाही. त्यानंतर मयताच्या आईनेच पुन्हा २७ फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन आपल्या मुलाला लपका व त्याच्या साथीदारांनी कारमधून पळवून नेले, अशी तक्रार दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी तपास हाती घेतला.
गुन्हे शाखेने केली उकल
ज्यांनी अपहरण केले त्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण ज्याचे अपहरण झाले तो वैभव मिळून आला नव्हता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संशय आला. त्यांनी दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले. त्यांनी घटनेचा उलगडा केला.
मयताला अमानुष मारहाण
मयत नायकोडी याला अगोदर निर्जनस्थळी मारहाण करण्यात आली. नंतर नवनागापूर येथील चेतना कॉलनीत असलेल्या फ्लॅटवर मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह डोंगरात नेऊन जाळला.