धक्कादायक! कॅफेवर पोलिसांनी टाकला छापा; पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:45 IST2024-12-03T11:44:55+5:302024-12-03T11:45:09+5:30
कॅफेत चहा व कॉफीचे साहित्य मिळून आले नाही. मात्र आतील बाजूस छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून त्यात मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आले.

धक्कादायक! कॅफेवर पोलिसांनी टाकला छापा; पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे
अहिल्यानगर : शहरातील जुने कोर्ट परिसरातील द परफेक्ट कॅफेवर छापा टाकत पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुण- तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि. २) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. भर वस्तीत हे कॅफे सुरू होते. कॅफेचा मालक महेश पोपट खराडे (रा. रभाजीनगर, केडगाव) व चालक अनुज शिवप्रसाद कुमार (वय ३०, रा. प्ररबुजूर्ग फत्तेहपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत.
शहरातील जुने कोर्ट परिसरात भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेजची मुले-मुली अश्लील चाळे करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांच्या पथकाने कोर्ट गल्ली द परफेक्ट कॅफेवर छापा टाकला. त्यावेळी तिथे चहा व कॉफीचे साहित्य मिळून आले नाही. मात्र आतील बाजूस छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून त्यात मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आले. समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले असून, कॅफे चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक योगिता कोकाटे, विकास काळे, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, संभाजी कोतकर, अभय कदम, अमोल गाढे, रिंकू काजळे, अनुज झाडबुके, सतीश शिंदे, पूजा दिख्खत, कोमल जाधव, पल्लवी रोहकले आदींच्या पथकाने केली.