शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
By Admin | Updated: October 17, 2016 01:04 IST2016-10-17T00:41:16+5:302016-10-17T01:04:21+5:30
वाळकी : वडिलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाळकी (ता. नगर) येथे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
वाळकी : वडिलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाळकी (ता. नगर) येथे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. शुभम बाबासाहेब भांड (वय १६) हे मृत मुलाचे नाव आहे.
शुभम वडील बाबासाहेब भांड यांच्यासमवेत घराजवळीलच विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. शुभमला पोहता येत नसल्याने वडील त्याला पोहण्यास शिकवत होते. परंतु वडिलांच्या हातातून निसटून तो पाण्यात बुडाला. शोध घेऊनही शुभमचा तपास न लागल्याने वडिलांनी आक्रोश केला. हा आक्रोश ऐकून अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन शोध कार्य सुरु केले. परंतु यश न आल्याने अहमदनगर महापालिकेच्या अग्नीशामक दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. जवानांनी शोध मोहीम हाती घेतल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास शुभमचा मृतदेह हाती लागला.
मयत शुभम याच्यावर दुपारी दीडच्या सुमारास वाळकी येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुभम याने गेल्यावर्षी दहावीनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेतला होता. यंदा वाळकी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अकरावीला शिकत होता. बाबासाहेब भांड यांना दोन मुले आहेत. पैकी शुभम थोरला होता. या घटनेमुळे वाळकी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
(वार्ताहर)