Satyajit Tambe: माझ्याविरुद्ध मोठं षडयंत्र रचलं, सत्यजित ताबेंनी आज सगळंच ओपन केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 17:08 IST2023-02-04T16:57:31+5:302023-02-04T17:08:24+5:30
Satyajit Tambe: सत्यजित यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, माझ्याविरुद्ध मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचेही ते म्हणाले.

Satyajit Tambe: माझ्याविरुद्ध मोठं षडयंत्र रचलं, सत्यजित ताबेंनी आज सगळंच ओपन केलं
अहमदनगर - राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवला. त्यानंतर, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज म्हणजेच ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन मधल्या काळात झालेल्या राजकारणाचा पर्दाफाश केला. सत्यजित यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, माझ्याविरुद्ध मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचेही ते म्हणाले.
अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांची बाजू घेत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली तर तांबे यांना सल्लाही दिला होता. त्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भूमिका मांडली. मात्र, सत्यजित तांबे यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उघडपणे नाव घेणं टाळलं पण प्रदेशाध्यक्ष म्हणत नाना पटोलेच या कारस्थानामागे होते, असेही त्यांनी एकप्रकारे सांगून टाकले. मी काँग्रेस पक्षातून बाहेर पडावं, अशीच काहीजणांची इच्छा होती. मला आणि माझ्या कुटुंबाला थोरात आणि तांबे परिवाराला बदनाम करण्याचा हा डाव होता, असे सत्यजित यांनी म्हटले. तसेच, मला काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी मी प्रयत्न करत होता. मी नानांकडे तशी विनंतीही केली होती. विशेष म्हणजे मी केंद्रीय नेतृत्त्वाकडे तशी विनंती केली, त्यांनी मला लिखीत पत्र देण्याचं सूचवलं. मी पत्रही दिलं. पण, पत्र दिल्यानंतर दोन तासांतच इकडे दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला
मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे, मला सर्वच पक्षांनी, सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला. म्हणूनच मी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे, मी यापुढेही अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. यापुढे मी सर्वच लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मांडणार आहे. सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षातील नेत्यांनाही मी गरजेनुसार भेटून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. मी सर्वांचे आभार मानतो, काँग्रेसवाले १०० टक्के माझ्याच सोबत होते, असेही सत्यजित यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सत्यजित तांबेंनी गेल्या १५ दिवसांत घडलेलं राजकारण व्यक्त करताना थेट नाना पटोलेंकडेच बोट दाखवले आहे.
जाणीवपूर्वक औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म दिला
बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि मला उमेदवारी मिळू नये तसेच मला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठीच स्क्रिप्ट करण्यात आली होती असा गंभीर आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला. एबी फॉर्म देताना प्रदेश काँग्रेसने औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म पाठवावा ही जाणीवपूर्वक केलेली चूक होती असा आरोपही तांबे यांनी यावेळी केला. तसेच, याबाबत पक्षश्रेष्टींकडून काय कारवाई होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण पक्ष सोडलेला नाही, मात्र आमदार अपक्ष असल्याचे तांबे म्हणाले.