साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 23:36 IST2025-02-11T23:35:56+5:302025-02-11T23:36:38+5:30
हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केले जात आहे. यापूर्वी जुलै २००७ मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता.

साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू
शिर्डी : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचे काम सुरू आहे. हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केले जात आहे. यापूर्वी जुलै २००७ मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता.
साईबाबा संस्थान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या देणगीतून अनेक सामाजिक कार्ये चालतात. विजयकुमार यांच्यासारख्या अनेक साईभक्तांनी मंदिराला सोने आणि चांदीच्या वस्तू दान केल्या आहेत. या दानामुळे मंदिराची शोभा वाढली आहे, तसेच साईबाबांच्या कार्यालाही हातभार लागला आहे.
विजयकुमार हे अनेक वर्षांपासून साईबाबांचे भक्त आहेत. कळसाला सुवर्ण मुलामा देण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. या कामासाठी किती सोने वापरले जात आहे, हे त्यांनी गुप्त ठेवले आहे.
- गोरक्ष गाडीलकर, सीईओ.
विद्युत रोषणाई टाळण्याचा सल्ला
विजयकुमार यांनी सुवर्ण मुलामा दिलेल्या कळसाला विद्युत रोषणाई न करण्याची सूचना साईबाबा संस्थानला दिली आहे. तिरुपती बालाजी आणि द्वारका येथील मंदिरांच्या उदाहरणांचा हवाला देत, विद्युत बल्बच्या उष्णतेमुळे सुवर्ण मुलामाला तडे जातात, असे त्यांचे म्हणणे आहे.
शिखराची झळाळी वाढेल
साईबाबांच्या भक्तांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. मंदिराच्या कळसाला पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा मिळाल्याने मंदिराच्या शिखराची झळाळी वाढेल. सप्टेंबर २०२३ मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यालाही आतून सुवर्ण मुलामा देण्यात आला आहे.