पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून झेंडू लावला. फुलशेती बहरात आली आणि फुलांचे बाजार कोसळले. १० किलोच्या कॅरेटला २० ते २५ रुपये पेक्षा जास्त भाव मिळत नाही. फुल तोडणीसाठी एक मजूर महिला २०० रुपये रोज घेते. मार्केटमध्ये पाठवण्याचा खर्च करायचा कसा? बाजार भाव नसल्याने झेंडूवर रोटा घातला. गणपतीपर्यंत झेंडू फड टिकला असता पण कोरोना रुग्ण वाढू लागलेत. पुन्हा लाॅकडाऊनची भीती असून फुलांचे भाव वाढण्याची शक्यता नाही म्हणून हे पाऊल उचलल्याचे निंब्रळ येथील शेतकरी रवींद्र डावरे सांगतात.
खर्च करून अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने वीरगाव येथील शेतकऱ्यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची वेळ आली. कष्ट करूनही प्राक्तनात घामाचे दाम नसल्याने व्यथा सांगावीच कुणाला आणि निवारणार कोण या संभ्रमात शेतकरी आहेत. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी या पिकांबरोबरच झेंडू नगदी पिके शेतात उभी आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याचे बाजारभाव मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून कर्जबाजारी होण्याचीही वेळ आली.
टोमॅटो पिकाचा उत्पादन खर्च एकरी एक ते दीड लाखापर्यंत होतो. कोबी, फ्लॉवर आणि वांग्याचाही साठ हजारांपर्यंत खर्च केला जातो. परंतु मिळणाऱ्या बाजारभावात उत्पन्न तर सोडा झालेला खर्चही पदरी पडणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या उभ्या फडात मेंढरे सोडून दिली आहे.
...............
भाजीपाल्याचे भाव पडले
भाजीपाल्याचे भाव पडले आहे. टोमॅटो, कोबी २ रुपये, फ्लॉवर ५ रुपये, भेंडी, वांगी ८ रुपये, ढोबळी ४ रुपये प्रतिकिलो असा भाव पुणे बाजारपेठेत मिळत आहे. शेतात उभारलेल्या भाजीपाल्याची तोडणी करणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याने अखेर हातातोंडाशी आलेला घास सोडून देण्याची वेदना अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते.
..................
हमीभाव देऊ अशी वल्गना सारेच करतात परंतु शेती प्रश्नांवर केवळ राजकारण केले जाते. हमी बाजारभाव दिल्याशिवाय आर्थिक अरिष्ट दूर होणार नाही.
- भाऊसाहेब सखाराम चासकर, बहिरवाडी