तोंडाला चिकटपट्टी लावली, महिलेचा कान तोडून दागिने ओरबाडले; चोरट्यांच्या क्रूरतेने अहिल्यानगर हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 20:13 IST2025-07-09T20:11:00+5:302025-07-09T20:13:09+5:30
अहिल्यानगरमध्ये चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत ४ लाखांचा ऐवज केला लंपास केला.

तोंडाला चिकटपट्टी लावली, महिलेचा कान तोडून दागिने ओरबाडले; चोरट्यांच्या क्रूरतेने अहिल्यानगर हादरलं
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून चोरीची हादरवणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी इथल्या वस्तीमधल्या एका घरामध्ये घुसून दहा ते बारा चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण करत तब्बल चार लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटून नेला. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्याने वृद्ध महिलेचा कान तोडून दागिने ओरबाडले.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बालमटाकळी इथल्या मध्यवस्तीतील पेठेत राहणाऱ्या हिरालाल धोंडलकर (वय ७५) यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून दहा ते बारा चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी हिरालाल धोंडलकर यांना मारहाण केली. त्यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर (वय ७०) यांनाही चोरट्यांनी तोंडाला चिकटटेप लावून लोखंडी गजाने मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले.
अरुणाबाई यांच्या कानातील दागिने ओरबाडताना त्यांचा कानाला गंभीर दुखापत झाली. वृद्ध दाम्पत्यास जबरी मारहाण करून अंदाजे ४ तोळे दागिने चोरट्यांनी लुटले. त्यानंतर शेजारील पांडुरंग पाथरकर यांच्या स्टेशनरी दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला. स्टेशनरी दुकानाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यामधील अंदाजे ३ हजारांची रोख रक्कम, १५ हजारांचे बेन्टेक्स दागिने व २० हजारांचे इतर दागिने घेऊन चोरटे तेथून पसार झाले.
बालमटाकळी येथील वृद्ध दाम्पत्याला चोरट्यांनी ओरडू नये यासाठी तोंडाला चिकटपट्टी लावून मारहाण केली. तसेच वृद्ध महिलेच्या कानातील दागिने चोरट्यांनी निर्दयपणे बळजबरीने ओरबाडून काढले. त्यामुळे वृद्ध महिलेच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान जागीच घुटमळत राहिल्याने पोलिसांना चोरट्यांचा मागमूस लागला नाही.
दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेचा तपास तातडीने लावण्याची मागणी केली आहे. बालमटाकळी तसेच बोधेगाव परिसरात यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा जबरी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.