मस्साजोगची पुनरावृत्ती! पवनचक्कीच्या खंडणीसाठी मारहाण; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 23:00 IST2025-11-19T23:00:00+5:302025-11-19T23:00:12+5:30
दरोडी शिवारात सेनवियान या कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. कंपनीच्या कार्यालयात राजेंद्र घुले (रा. कारेगाव, ता. पारनेर) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मस्साजोगची पुनरावृत्ती! पवनचक्कीच्या खंडणीसाठी मारहाण; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा प्रताप
लोकमत न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षासह सात ते आठ कार्यकर्त्यांनी पवनचक्की प्रकल्प चालू ठेवण्यासाठी महिना दोन लाखांच्या हप्त्याची मागणी करत कार्यालयात घुसून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विकास राघू पवार (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरोडी शिवारात सेनवियान या कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. कंपनीच्या कार्यालयात राजेंद्र घुले (रा. कारेगाव, ता. पारनेर) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवारी कार्यालयात असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार व त्याच्यासोबत सात ते आठजण तेथे आले. पवार याने घुले यांना खुर्चीवरून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तू येथे कसे काम करतोस? असे पवार सुरक्षा रक्षकाला म्हणाला. त्यानंतर त्याच्यासोबतच्या इसमांनी कार्यालयात धुडगूस घालत संगणक, टेबलची तोडफोड केली. तसेच सुरक्षा रक्षकाचा मोबाइल फोडला.
‘पवनचक्की चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये मला द्यावे लागतील, असे तुझ्या मालकाला सांग’, अशी धमकी पवार याने दिली. त्यानंतर पवार याने सुरक्षा रक्षकाच्या खिशातील २२ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. ही बाब कंपनीचे तेथील कर्मचारी किरण पवार यांना समजल्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींच्या तावडीतून घुले याची मुक्तता केली. याबाबत पारनेर पोलिस ठाण्याला पवारसह अनोळखी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.