पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:36 IST2025-04-04T10:35:14+5:302025-04-04T10:36:34+5:30

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे.

Relief for Sai devotees going from Pune to Shirdi Distance will be reduced by 50 to 60 kilometers | पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग?

पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग?

Shirdi Sai Baba : पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या राहाता ते संगमनेर तालुक्यातील पानोडी या ३६ किलोमीटरच्या काँक्रीट रस्त्याचे सुमारे १५४ कोटी रुपयांचे काम सुरू झाले आहे. पुणे येथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांचे या रस्त्यामुळे ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई या कार्यालयामार्फत हे काम होत आहे. राहाता, दहेगाव, केलवड, पिंपरी- लोकाई, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी, शिपलापूर व पानोडी या गावांतून हा रस्ता जाणार आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे. केलवड ते दहेगाव दरम्यानचा डांबरी रस्ता पूर्णपणे फोडला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कसा असेल रस्ता?
रस्ता ७ मीटर रुंद असून, दोन्ही बाजूने दीड - दीड मीटर मुरूमीकरण म्हणजेच एकूण १० मीटरचा हा दोन पदरी मार्ग आहे. केलवड, आश्वी व शिपलापूर या मोठ्या गावांमध्ये १० मीटरचे काँक्रिटीकरण, दोन्ही बाजूने एक-एक मीटर पेव्हिंग ब्लॉक व दोन्ही बाजूने १.२०० मीटर साईड गटार म्हणजेच या तीन गावांमध्ये एकूण १४.५ मीटरचा हा रस्ता असेल. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेले हे काम ३० महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे.

दरम्यान, "अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांना जिल्ह्यात येण्यासाठी चांगल्या आणि कमी अंतराचे रस्ते विकसित करणे महत्त्वाचे आहे. प्रस्तावित मार्ग भाविक, नागरिक, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल," असं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Title: Relief for Sai devotees going from Pune to Shirdi Distance will be reduced by 50 to 60 kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.