केडगाव : गावठी हातभट्टीची दारू, कच्चे रसायन असलेल्या एका दारू अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा घालून ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाळकी येथे केली.
वाळकी येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून, मोठ्या प्रमाणात दारू बनवून विक्री केली जाते, अशी माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी वाळकीतील धोंडेवाडी येथील तलावाजवळ सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच दारू अड्डा मालक संतोष दिलीप पवार हा पळून गेला. या कारवाईत चोवीस हजारांची चारशे लिटर हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, सात हजार रुपये किमतीची सत्तर लिटर हातभट्टी तयार दारू असा ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस हवालदार गणेश लबडे, महिला पोलीस हवालदार अमिना शेख, पोलीस हवालदार काळे, पोलीस नाईक बी.बी. कदम, योगेश ठाणगे यांनी केली.