शिंदेसेना जिल्हाप्रमुखाच्या घरावर छापा, भीतीमुळे वाढला रक्तदाब; घरात काहीच सापडले नाही; प्रशासनावर दहशतीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 23:35 IST2026-01-12T23:34:54+5:302026-01-12T23:35:41+5:30
शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीला शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘शिंदे घरात जेवण करत होते. आपल्या सुना-नातवंडे घरात होते.

शिंदेसेना जिल्हाप्रमुखाच्या घरावर छापा, भीतीमुळे वाढला रक्तदाब; घरात काहीच सापडले नाही; प्रशासनावर दहशतीचा आरोप
अहिल्यानगर : शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या घरावर महापालिका निवडणुकीचे भरारी पथक व व पोलिसांनी सोमवारी पाचच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यामुळे शिंदे यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या छाप्यात काहीच सापडले नाही, असे प्रशासनाने सांगितले.
शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीला शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘शिंदे घरात जेवण करत होते. आपल्या सुना-नातवंडे घरात होते. प्रशासन व पोलिस घरात घुसले. घरात महिला असताना ते थेट किचनपर्यंत आले व झाडाझडती सुरू केली. या प्रकारामुळे आपले पती घाबरून गेल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली’.
शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून शहराचे आजी, माजी लोकप्रतिनिधी व प्रशासन सतत त्रास देत आहेत. आम्ही प्रचाराला गेलो तरी मागे गुंड पाठविले जातात. साधी पत्रके वाटून दिली जात नाही, असा आरोप शीला शिंदे व पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी केला आहे. शिंदेसेना महापालिकेत विजय मिळवेल, ही भीती असल्याने येथील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे प्रशासनाला हाताशी धरून ते दहशत माजवू लागले आहेत. पण शिंदे यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास गाठ शिवसेनेशी व एकनाथ शिंदे यांच्याशी आहे हे लक्षात घ्या, असा इशारा भोर यांनी दिला आहे.
कारवाई कुणी केली? प्रशासनाची ढकलाढकल
या छाप्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता ते म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीत निवडणूक शाखेच्या भरारी पथकाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांनी हा छापा टाकला. पोलिस त्यांच्या मदतीला होते. छाप्यात काहीही सापडलेले नाही’. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता ‘आमच्याकडे हराळे नावाच्या व्यक़्तीने तक्रार केली होती. ती आम्ही उपअधीक्षकांकडे दिली. त्यानंतर त्यांनी छापा टाकला’, असे ते म्हणाले. पोलिस म्हणताहेत की कारवाई निवडणूक विभागाने केली, याकडे डांगे यांचे लक्ष वेधले असता ‘आमच्या कुठल्या पथकाने कारवाई केली ही माहिती आपणाकडेही नाही’, असे त्यांनी सांगितले.