जनसेवाचा पॅनल गुलदस्त्यात
By Admin | Updated: November 20, 2014 14:23 IST2014-11-20T14:23:56+5:302014-11-20T14:23:56+5:30
सत्ताधारी सहकार पॅनलमधील उमेदवार जाहीर झाले असले तरी विरोधी गटाच्या जनसेवा पॅनलचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पॅनेलच्या नेत्यांची तारांबळ उडाली आहे.

जनसेवाचा पॅनल गुलदस्त्यात
अहमदनगर : सत्ताधारी सहकार पॅनलमधील उमेदवार जाहीर झाले असले तरी विरोधी गटाच्या जनसेवा पॅनलचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पॅनेलच्या नेत्यांची तारांबळ उडाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पॅनेलमधील उमेदवार जाहीर करणार असल्याची भूमिका जनसेवाच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान बुधवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली असून ८३ पैकी ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ८३ उमेदवारांनी १४६ अर्ज दाखल केले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची अर्बन बँकेच्या सभागृहात छाननी झाली. पुणे येथील विभागीय उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीव खडके आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एम.जी. गायकवाड यांनी अर्जांची छाननी केली. छाननीसाठी सहकार आणि जनसेवा पॅनेलमधील उमेदवार हजर होते. १८ जागांसाठी ८३ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये तीन जणांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झाले ते तिन्ही उमेद्वार खासदार दिलीप गांधी यांच्या गटाचे उमेदवार आहेत. सुनील कुलकर्णी, सोपान पंडित आणि प्रविण पाचरणे या तिघांचे अर्ज बाद झाले आहेत. हे उमेद्वार गांधी गटाचे असले तरी त्यांचा पॅनेलमध्ये समावेश नव्हता. तीन अर्ज बाद झाल्याने आता ८0 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
------
■ वैध झालेल्या ८0 उमेदवारांची यादी अर्बन बँकेच्या सभागृहात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना २0 ते २२ नोव्हेंबर या काळात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अर्ज माघारी घेता येणार आहेत. शनिवारी दुपारी दोनवाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. उमेदवारास आपली उमेदवारी मागे घेतल्याची नोटीस समक्ष अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ही नोटीस कधीही बदलता येणार नाही, तसेच रद्द करता येणार नाही, असे खडके यांनी सांगितले.
जनसेवाचे नेते
■ विरोधकांच्या जनसेवा पॅनेलला नेत्यांची संख्या जास्त झाली आहे. जनसेवा पॅनेलकडून इच्छुक असलेल्यांची संख्या ३४ झाली आहे. त्यामुळे पॅनल निश्चित करण्यास अडचणी येत आहेत.नेत्यांची संख्या जास्त असल्याने एकत्रित येऊन निर्णय घेण्यास अडथळे येत आहेत. अशोक कोठारी, सुभाष भंडारी, दीप चव्हाण, राजेंद्र गांधी, अभय आगरकर, वसंत लोढा असे हे नेते आहेत.