अहमदनगर : भिंगार शहरात गेल्या ११ दिवसांपासून पाणी सोडले नसल्याने नागरिकांना वणवण करावी लागत आहे. छावणी परिषदेमध्ये सात नगरसेवक आणि एक मुख्य कार्यकारी अधिकारी असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. प्रशासन दगड बनले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दगडांची पूजा करून छावणी परिषदेचा निषेध केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा शहर संघटक मतीन सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली छावणी परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सात नगरसेवक आणि एक सीईओ यांच्या नावाचे आठ दगड ठेवून पूजा करण्यात आली. नागरिकांना लवकरात लवकर रोज पाणी मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भिंगार शहराला दररोज पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात यावे अन्यथा येत्या मंगळवारी भिंगार शहर कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा मतीन सय्यद यांनी दिला आहे.
भिंगार येथील छावणी परिषद हद्दीतील संपूर्ण भिंगार शहरात अकरा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. पिण्याचे पाण्याच्या टॉंकरद्वारे मोजक्याच ठिकाणी पाणी वाटप केले जात आहे. सदर पाण्याचे नागरिकांकडूनच पैसे घेतले जातात. बोअरही नादुरुस्त आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बुधवारी मोर्चा काढून प्रतिकात्मक निषेध केला. या आंदोलनात संभाजी भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, ईश्वर भंडारी, इब्राहिम चौधरी, निसार शेख, आसिफ शेख, मदिना शेख, नुरजहॉ शेख, गुलनाज सय्यद,अनुराधा भंडारी, शोभा भंडारी, ज्योती देवतरसे, सुशीला देवतरसे, राणी विधाते, कुसुम वागस्कर, नलिनी भिंगारदिवे, सुंदर भिंगारदिवे, सरिता पंडित, रोहिणी पंडित, नासिर शेख, स्वप्निल पवार, हाजी आरिफ, अन्सार सय्यद, जाफर शेख,शानवाज काजी,तनवीर शेख,अंजुम सय्यद आदी सहभागी झाले होते.
--
फोटो- १६ भिंगार मोर्चा
छावणी परिषदेच्या निषेधार्थ भिंगार येथील नागरिक, महिलांनी दगडांची पूजा करून पाणी सोडण्याची प्रशासनाला बुद्धी व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मतीन सय्यद यांच्यासह नागरिक