निराधारांच्या आधारासाठी दानशूरांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:19 IST2021-02-08T04:19:22+5:302021-02-08T04:19:22+5:30
तिसगाव : अनाथ, निराधारांच्या आधारासाठी व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे, असे ...

निराधारांच्या आधारासाठी दानशूरांनी पुढे यावे
तिसगाव : अनाथ, निराधारांच्या आधारासाठी व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी केले.
तिसगाव येथील तुळजापूर पेठ येथील निराधार महिमा जगधने व इतर विद्यार्थिनींना शालेय साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते. येथील अनंत जगधने यांचे मागील वर्षी अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार निराधार बनला. या परिवाराला राहण्यासाठीसुद्धा स्वतःचे घर नाही. स्वर्गीय अनंत जगधने यांना चार मुली असून त्यांची मोठी मुलगी महिमा जगधने ही वृद्धेश्वर हायस्कूलच्या सातव्या वर्गात शिकत आहे.
त्रिभुवनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वामन शेरकर यांनी या मुलीला दत्तक घेतले असून या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला आहे. तिच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली. या वेळी शिक्षक विजय कारखेले व ज्येष्ठ विचारवंत भाऊसाहेब शेलार यांनीही या मुलीला मदतीचा हात दिला. मुलीला शालेय गणवेश, दप्तर, शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अंबादास शिंदे, भाऊसाहेब शेलार, पोस्टमास्तर अनिल शिंदे, गोरक्ष ससाणे, रघुराज कारखेले आदी उपस्थित होते. जगधने परिवारातील आराधना, स्तुती जगधने या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनुक्रमे चौथ्या व पहिल्या वर्गात शिकत आहेत. प्रीती जगधने ही पूर्व प्राथमिक वर्गात शिकत आहे. या तीनही मुलींना समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे, असे कारखेले यांनी आवाहन केले.