काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:22 IST2025-01-13T05:21:22+5:302025-01-13T05:22:13+5:30
शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते.

काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी
शिर्डी : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत यशाचे सुवर्ण शिखर गाठले. मात्र, विजयाचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याची आता जबाबदारी आहे. काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे आले, यातील फरक जनतेला सांगता आला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केवळ निवडणुकीतील यशाने मोठेपण येत नाही, अशीही सूचना त्यांनी केली.
शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते. गडकरी म्हणाले, निवडणुकांमध्ये नेते आमदार, खासदार होतात. मात्र, सर्वच आठवणीत राहत नाहीत. गुणांनी माणूस मोठा होतो. लोकांचे जीवन सुसह्य करणारे नेते हेच आठवणीत राहतात. भाजपच्या सत्तेत येण्याने काय झाले हे कामातून दाखवावे लागेल. जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवशाही स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करावयाचा आहे. ग्रामीण भागातून तरुणांचे मोठ्या प्रमाणावर शहरात विस्थापन होत आहे.
ऑटोमोबाइलमध्ये महाराष्ट्राची भरारी
ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने मोठी भरारी घेतली आहे. हे क्षेत्र देशाला सर्वाधिक कर मिळवून देते. ऑटोमोबाइलमध्ये राज्याला जगात प्रथम क्रमांकावर येण्याची क्षमता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ हजार कोटी रुपयांची टोयोटा कंपनी गुंतवणूक करत आहे, अशी माहितीही मंत्री गडकरी यांनी दिली.
खेडी ओस पडू देऊ नका
खेडी ओस पडत आहेत. ते थांबवावे लागेल. प्रत्येक तालुका, गाव हे स्मार्ट झाले तरच विस्थापन रोखता येऊ शकते. गडचिरोली जिल्ह्यात भाजपने विकासाचे मॉडेल राबविले आहे.
तो जिल्हा येत्या पाच वर्षांत सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणारा ठरेल, असेही गडकरी यांनी सांगितले.