औटी यांच्या उमेदवारीला विरोध
By Admin | Updated: July 19, 2014 00:35 IST2014-07-18T23:21:50+5:302014-07-19T00:35:40+5:30
अहमदनगर: आमदार विजय औटी हे पक्षापेक्षा व शिवसैनिकांपेक्षा स्वत:ला ‘सुप्रिम’ समजत आहेत. त्यांचा स्वभाव हा सर्वसामान्यांना सामावून घेणारा नाही.

औटी यांच्या उमेदवारीला विरोध
अहमदनगर: आमदार विजय औटी हे पक्षापेक्षा व शिवसैनिकांपेक्षा स्वत:ला ‘सुप्रिम’ समजत आहेत. त्यांचा स्वभाव हा सर्वसामान्यांना सामावून घेणारा नाही. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार बदला, अशी मागणी शुक्रवारी शिवसैनिकांनी येथे बैठकीत केली. ही मागणी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकण्यास आक्षेप घेतल्याने औटींविरोधात पक्षात वातावरण तापले आहे. शुक्रवारी दुपारी शहरात हॉटेल यश ग्रँड येथे नगर तालुका शिवसेनेने बैठक बोलावली होती. या बैठकीला पारनेरचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे, गणेश शेळके, बाबाजी तनपुरे, गजानन सूर्यवंशी यांच्यासह नगर तालुका प्रमुख संदेश कार्ले, जि.प. सदस्या शारदा भिंगारदिवे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तांबे म्हणाले, जिल्हा परिषदेत मी गाडे यांच्यामुळे सभापती झालो. औटी यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यांना पक्षाचे काहीही घेणे-देणे नाही. त्यांची राष्ट्रवादीत जाण्याची तयारी चालली होती. पण केंद्रात महायुतीची सत्ता आल्याने आता पवित्रा बदलला आहे. नऊ वर्षात त्यांनी एकही शाखा उभारलेली नाही. पारनेर पंचायत समितीतही मला उपसभापतीपद न देता आझाद ठुबे यांना पद देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पारनेरमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड असंतोष आहे. कार्यकर्त्यांना अपमानित करणे हा त्यांचा गुणधर्म आहे. गणेश शेळके यांच्या रुपाने त्या भावना बाहेर आल्या आहेत.
दत्ता पवार म्हणाले, औटी हे सेनेच्या जिवावर निवडून येतात. पण नंतर सैनिकांना किंमत देत नाहीत. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देऊन मते मिळतात का? असा सवाल ते कार्यकर्त्यांना करतात. पक्षाच्या घोषणेलाच ते आक्षेप घेतात. कार्ले यांनीही औटी हे बुरखाधारी आहेत. त्यांचा खरा चेहरा वेगळा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी नको, अशी मागणी केली.
उमेदवार बदलण्याच्या मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला. औटी यांनी चुकीचा प्रकार केला आहे. मात्र सैनिकांनी पक्षशिस्त पाळावी. आपण सर्वांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असे गाडे यावेळी म्हणाले. तुकाराम तनपुरे, देवराम लामखडे, केशव निकम, जि.प. सदस्य दत्तात्रय सदाफुले, पोपट निमसे, बाबासाहेब पिसे, आप्पा निमसे, कैलास कुलट आदी उपस्थित होते.